तुम्ही माझे मी तुमचा

तुम्ही माझे मी तुमचा

जुन्या शिवसैनिकांशी शिवसेनाप्रमुखांनी साधलेला हृद्य संवाद!
अनेकजण शुभेच्छा देताना दीर्घायुषी व्हा, आमच्या आयुष्यातील आणखी पाच वर्षे घ्या म्हणतात. आता इतरांची वर्षे घ्यायची म्हटलं तर माझं वय किती होणार! या वयाला म्हणायचं तरी काय! ना म्हातारा ना तरुण ना मधला.
‘तुम्ही माझे, मी तुमचा’ यात कुठेही अंतर येणार नाही. आजही माझ्या जुन्या शिवसैनिकांच्या तलवारींना गंज चढलेला नाही.’ अशा शब्दांत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जुन्या कडवट शिलेदारांचा गौरव केला.“निवडणुका येत आहेत. कंबर कसा, मतांच्या तलवारी पाजळून ठेवा. कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेवरील भगवा खाली उतरता कामा नये,” असा आदेशही शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. रंगशारदामध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी जुन्या शिवसैनिकांशी हृद्य संवादच साधला. शिवसेनेच्या स्थापनेपासून इतिहास जिवंत करतानाच ९३ च्या दंगलीत फटके देऊन देशद्रोही लांड्यांची मस्ती जिरवणाऱ्या शिवसैनिकांचीही शिवसेनाप्रमुखांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षासाठी अहोरात्र ज्येष्ठ शिवसैनिकांचा भव्य मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाला. शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील जुन्या-जाणत्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी सभागृह खच्चून भरले होते. मुंगी शिरायलाही वाव नव्हता. सभागृहातील मोकळ्या जागाही व्यापून गेल्या होत्या. महिला शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती. मेळावा सायंकाळी सातला असला तरी चार वाजल्यापासून रंगशारदाकडे जाणारे सारे रस्ते शिवसैनिकांच्या तुफान गर्दीने फुलून गेले होते. लीलावती रुग्णालयापासूनच सर्वत्र भगवे झेंडे डौलाने फडकत होते. सभागृहातील वातावरण कमालीच्या चैतन्याने भारले होते. सर्वत्र भगव्या टोप्या, उपरणी, भगवे फेटे यांचेच चित्र दिसत होते. शिवसैनिकही एखाद्या उत्सवाच्या पावित्र्याने शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. सभागृहाइतकीच बाहेरही शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
शिवसेनाप्रमुख सभागृहात येताच शिवसैनिकांनी अदबीने उभे राहून त्यांना अभिवादन केले. शिवसेनाप्रमुखांनी एकवार संपूर्ण सभागृहावर दृष्टिक्षेप टाकत अभिवादनाचा स्वीकार केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी बसूनच भाषणास सुरुवात केली. जमलेल्या माझ्या अत्यंत कडवट हिंदू शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी भावूक साद घालत शिवसेनाप्रमुख हळव्या स्वरांत म्हणाले, ’बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला भेटावे अशी इच्छा होती. यादी बनवूनही ठेवली होती, पण दौरे, सभा, मेळावे, कार्यक्रमांतून उसंत मिळतच नाही. नाही म्हटलं तरी आता थोडीशी जवानी गेली. पण विचाराने म्हातारा झालेला नाही. तुमच्याइतकाच मी विचाराने तरुण आहे. जेव्हा माणसं विचारांनी म्हातारी होतात तेव्हा संपतात. गेल्या ४० वर्षांत तुम्ही माझ्याबरोबर आहात याची आठवण कायम आहे. लालबाग-परळचे शिवसैनिक तर सोबत आहेतच आहेत अशा शब्दांत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकी मारत शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले, अनेक जण शुभेच्छा देताना दीर्घायुषी व्हा, आमच्या आयुष्यातील आणखी पाच वर्षे घ्या म्हणतात. आता इतरांची वर्षे घ्यायची म्हटलं तर माझं वय किती होणार! या वयाला म्हणायचं तरी काय! ना म्हातारा ना तरुण ना मधला. शिवसेनाप्रमुखांनी वयोमानावर कोटी करताच सभागृहात प्रचंड हशा उसळला.
भाषणाच्या ओघात शिवसेनेच्या स्थापनेचा विषय निघाला. शिवसेनाप्रमुख म्हणाले, शिवसेना सुरू केली. मराठी माणसांवरील अन्याय, अत्याचार मात्र कुठेतरी खुपत होता. त्याला वाट करून घ्यावी असे निश्चित होते. मग ठरलं संघटना काढूया. दादा म्हणाले, काय रे नाव काय देणार तुझ्या संघटनेला. म्हटलं अजून ठरलेलं नाही. एका क्षणात दादा म्हणाले, शिवसेना…. माँनी उदबत्ती लावली. सहदेव नाईकांनी नारळ फोडला. कोणतीही वेळ, मुहूर्त पाहिला नाही. नाहीतर आता प्रत्येक गोष्टीसाठी लोक ज्योतिषाकडे धाव घेतात. दिवस, वेळ पाहतायत. ज्योतिषाला उद्देशून ‘अरे दिवस तुला जाणार की मला?’ अशी शिवसेनाप्रमुखांनी कोपरखळी मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला. शिवसेनाप्रमुखांनी भविष्य, ज्योतिषावर कडाडून हल्ला चढविला. आमचा भविष्य, ज्योतिष्यावर विश्वास नाही. दादांचाही नव्हता असे सांगत उपस्थित शिवसैनिकांना तुम्ही आणि तुम्हीच शिवसेनेचे नशीब घडविणारे आहात. अडचणीच्या पडझडीच्या काळात शिवसैनिकांनीच मला मोलाची साथ दिली. दिवंगत झुंजार शिवसेना नेते कमांडर दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, शरद आचार्य आदींबद्दलही शिवसेनाप्रमुखांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिवसैनिकांमुळेच मुंबईत १९९३ नंतर दंगल घडली नाही. ९३ च्या दंगलीत लांड्यांना तुम्ही फटका दिलात. त्यामुळे पुन्हा वार करण्याची त्यांची हिंमतच आता होत नाही. तुमच्यासारखे असंख्य शेलारमामा शिवसेनेत आहेत. शेलारमामाचा एकच बार झाला आणि उदयभानू आडवा झाला. म्हणून पुन्हा एकदा निक्षून सांगतोय. उदयभानूनी मस्तीत राहू नये असा सणसणीत इशारा शिवसेनाप्रमुखांनी धर्मांध मुसलमानांना दिला. तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने सभागृह दणाणून गेले.
भाषणाच्या ओघात शिवसेनाप्रमुखांनी साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दै.’सामना’चा गौरवपूर्ण उल्लेख केला. विरोधकांचे हल्ले परतावून लावण्यासाठी ‘मार्मिक’ काढावा लागला. कुणी अरे म्हटले की कारे म्हणण्यासाठी आठवडाभर वाट पहावी लागत असे. ‘मार्मिक’मुळेच शिवसेना निघाली. फटकेबाजी सुरू आहे, असा उल्लेख करीत दै. ’सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. संजय राऊत चांगले विचार मांडताहेत. शिवसेनेची एक बाजू समर्थपणे सांभाळत आहेत. शिवसेनेमुळेच त्यांच्या लेखणीला धार आली. विरोधकांना ’रोख आणि ठोक’ देण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे असा विश्वास शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केला.
शिवसैनिकांच्या भीमपराक्रमाचाही सार्थ गौरव शिवसेनाप्रमुखांनी भाषणात केला. मालवण सभेनंतर मुंबईत परतताना वाटेत कौसा येथे मुस्लिमांनी केलेल्या आगळिकीला दिवंगत मनोहर नायडू या शिवसैनिकाने दिलेले चोख प्रत्युत्तर अभिमानास्पद वाटत असल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख म्हणाले, त्या वेळी फक्त अल्ला हो अकबर अशी हाक मुसलमानांनी देताच शेकडोंचा जमाव अंगावर चालून आला. मनोहर नायडू हातात तलवार घेऊन थेट मशिदीत घुसला. सपासप वार करीत अंगावर येणाऱ्यांना आडवे केले. ही ताकद फक्त शिवसैनिकांमध्येच आहे. बाकी इतर पक्षात सारे भोजनभाऊ इफ्तार पार्ट्या करणार, डोक्यावर मुसलमानी टोपी घालणार. या घटनेचा संदर्भ देत शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांची ही एकजूट हिंदूंमध्येही हवी. ’जय महाराष्ट्र’चा पुकारा झाल्यावर तमाम मराठी माणसे, हिंदू मजबुतीने एकवटले पाहिजेत इतकी तुमची दहशत असलीच पाहिजे, असे आवाहन करताच टाळ्यांचा कडकडाट करीत उपस्थितांनी अभेद्य एकजुटीचे दर्शनच घडविले.
’गिरणगाव संपला, परंतु परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत येणे काही थांबलेले नाही. बिहार, युपीचे लोंढे गुजरातेत का जात नाहीत? ते मुंबईवरच धडक देताहेत. सरकारचे तर यावर नियंत्रणच नाही. आपल्याकडे सरकार म्हणजे एक थट्टाच आहे.’
एमएमआरडीएच्या कामांबद्दलही त्यांनी टीकेची झोड उठवली. शिवसैनिकांना सक्त सूचना दिल्या, ज्या ठिकाणी एमएमआरडीएने खड्डे पाडून ठेवले आहेत, त्या ठिकाणी हा रस्ता एमएमआरडीए विकसित करीत असल्याचा सूचना फलक तेथे लावा. नाहीतर फुकटचे खापर महापालिकेवर फुटते आहे. सगळ्या शिव्या आपणच खातोय, तेव्हा शेण खाण्यापेक्षा शिव्या खाल्लेल्या केव्हाही चांगल्याच, असे शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले.
शिवसैनिकांमध्ये नवा-जुना असा भेद नको, हमरीतुमरी नको. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे असा विश्वास जागवीत शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना नम्र आवाहन केले. तुमच्या चांगल्या सूचना असतील तर सीलबंद पाकिटातून पोस्टाने मातोश्रीवर पाठवा, त्याचा नक्की विचार केला जाईल, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. वंदे मातरममुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. वंदे मातरम् हा राष्ट्रीय महामंत्र आहे. या राष्ट्रगीताचा योग्य सन्मान राखला गेलाच पाहिजे. वंदे मातरम् हे प्रथम आणि जन गण मन हे नंतर असावे अशी सूचनाही शिवसेनाप्रमुखांनी केली.
शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेबद्दल खोट्यानाट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या खासगी चॅनेल्सवर जबरदस्त आगपाखड केली. मी शिवसेना काढली तेव्हा ‘मार्मिक’ वगळता प्रसिद्धीसाठी माझ्याकडे कोणतेही माध्यम नव्हते. मात्र शिवसेनेत जरा खुट्ट झाले की आता हे चॅनेलवाले खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करतात. ही घाण आहे या चॅनेल्सवाल्यांमध्ये म्हणून मी कुणाही पत्रकारांना, चॅनेल्सना मुलाखती देणे साफ बंद करून टाकले आहे. मला तुमची जरूरी नाही. तुम्हाला माझी गरज आहे असे निक्षून सांगत. आम्ही तुम्हाला पाकीट देत नाही त्यामुळे काही न देताही आमच्या उलट बातम्या प्रसिद्ध करता. नाऱ्याकडून तुम्हाला पाकिटं येतात हे नाऱ्यानेच मला सांगितले आहे. मेळाव्यास शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, खासदार मनोहर जोशी, दै. ’सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते रामदास कदम, शिवसेना नेते सुभाष देसाई, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, अॅड. लीलाधर डाके, मधुकर सरपोतदार उपस्थित होते.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी