मराठी अस्मिता

मराठी अस्मिता

मराठीपण म्हणजे काय? मराठी अस्मिता म्हणजे काय?
‘नवयुग’च्या २४ एप्रिल १९६० च्या अंकात आचार्य अत्रे म्हणतात, ‘मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान आणि बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. तत्त्वासाठी आणि ध्येयासाठी तो वाटेल ते मोल द्यावयाला तयार होईल. देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्याचा जणू काही त्याने विडाच उचलला आहे. सिंहाच्या गुहेत जाऊन त्याच्या दाढेत हात घालण्याची त्याला विलक्षण हौस, शत्रूला आणि मृत्यूला भिणे म्हणजे काय हे त्याला मुळी माहीतच नाही, यालाच आम्ही महाराष्ट्राची ‘अस्मिता’ किंवा ‘मराठीपण’ म्हणतो.
सातव्या शतकाच्या प्रारंभी चिनी बौद्ध भिक्षू ह्युएनत्संग हा बौद्ध धर्मक्षेत्रांची यात्रा करण्यासाठी आला असता त्याने आपल्या प्रवासग्रंथात महाराष्ट्र देशाचे वर्णन करून ठेवले आहे. महाराष्ट्राला तो ‘मोहोलाच्छा’ म्हणजे ‘मोठे राज्य’ म्हणतो. मराठी लोकांचे वर्णन करताना तो म्हणतो, “येथील लोक साधे असून प्रामाणिक आहेत. त्यांचा बांधा उंच व स्वभाव निग्रही आणि करारी आहे. मित्रांशी कृतज्ञ, तर शत्रूंशी निर्दय अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांचा जर कोणी अपमान केला तर ते केव्हाही सहन करणार नाहीत. त्याचा सूड घेतल्याखेरीज ते राहत नाहीत. मग त्यात त्यांच्या प्राणावर संकट आले तरी ते त्याला भीत नाहीत. संकटात सापडलेल्याला मदत करण्यास ते नेहमी तयार असतात. तेव्हाही ते आपल्या प्राणाकडे बघत नाहीत. शत्रूचा सूड घ्यावयाचा जरी असला तरी ते त्याला अगोदर त्याची जाणीव देतील. त्याला शस्त्र घ्यावयालासुद्धा ते अवसर देतील. नंतरच ते त्याच्याशी लढायला तयार होतील. युद्धात ते धर्मयुद्धाचे नियम पाळतात. शत्रू हार खाऊन पळू लागला तर त्याचा ते पाठलाग करतील, पण त्याला ते मारणार नाहीत. शरणागताला नेहमी ते अभय देतात.”
महाराष्ट्रीयांच्या युद्धानीतीसंबंधी मुक्तेश्वराने आपल्या महाभारतात म्हटले आहे की, “ढाल-तलवार ही शस्त्रे धारण करणारे, सूड उगविण्याची प्रतिज्ञा करणारे, मरेतो न हटणारे, कधीही खंडिले न जाणारे असे लढणारे ते ‘महाराष्ट्रीय’ होत. या त्यांच्या लढण्याला महाराष्ट्र युद्ध म्हणतात.”
न्या. रानडे म्हणतात की, “आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवाजी महाराज सापडले हे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे संकट होय. कारण, समजा त्याप्रसंगी महाराजांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले असते तर, मराठी स्वराज्याची सारी इमारतच रसातळाला गेली असती आणि महाराष्ट्र कायमचा पारतंत्र्याच्या गर्तेत जाऊन पडला असता. पण औरंगजेबाच्या रूपाने मृत्यू समोर अक्राळविक्राळ जबडा आ वासून बसला असतानाही शिवाजी महाराजांनी त्याच्या दरबारात त्यांच्या तोंडावर त्याला आव्हान द्यायला कमी केले नाही.
मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग याच्याबरोबर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले असता त्यांचा अपमान करण्यासाठी औरंगजेबाने त्यांना मागल्या बाजूला उभे केले. तेव्हा शिवाजी महाराज एखाद्या सिंहाप्रमाणे रामसिंगावर कडाडले, ‘मी कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे. तुमच्या वडिलांना माहीत आहे. तुमच्या बादशहाला माहीत आहे. तरीही तुम्ही मला सर्वांच्या नंतर इतक्या मागे मुद्दाम उभे केले! तुमची ही मनसब मी फेकून देतो. तुमची खिलात मला नको. बादशहा मुद्दाम ज्या अर्थी मला जसवंतसिंगांनंतर बसवतोय, त्याअर्थी मला त्याची मनसब नको आहे. मला त्याची चाकरी नको. मला ठार करा. तुरुंगात टाका, काय वाटेल ते करा. बादशहाची खिलात मी कधी जन्मात घालणार नाही.’ असे म्हणून शिवाजी महाराज ताडकन् उठले नि बादशहाकडे पाठ फिरवून चालते झाले. औरंगजेबासारख्या हिंस्त्र आणि क्रूर बादशहाच्या दरबारात त्याच्या क्रोधाची किंवा संतापाची पर्वा न करता एवढ्या निर्भयतेने वागणे ही काय सामान्य गोष्ट आहे? हेच ते मोठेपण.”
हेच मराठीपण शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांनी दाखविले. त्यांच्यावर फितुरीचे आरोप ठेवून त्यांना १८३९ साली इंग्रजांनी पदच्यूत केले. त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिज यांना तर याहीपेक्षा तडफदार उत्तर प्रतापसिंहाने दिले. ते म्हणाले, “अरे, तुम्ही मला काय दुकानदार, सावकार का बंगाली बाबू समजता? मराठी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या गादीवरचा त्यांचा खास वंशज आहे मी. त्या स्वराज्यावरील हक्क मी सोडून देऊ म्हणता? असे करून माझ्या पूर्वजांच्या नावाला मी तर कलंक लावणार नाहीच, पण माझा एकही वंशज तसे करणार नाही. तुमच्या अटी मान्य करण्यापेक्षा मी मरण पत्करीन.” असे परम धैर्याचे निर्वाणीचे उद्गार मराठी माणसाखेरीज दुसरा कोणीही काढणार नाही.
भारत सरकारच्या मंत्रिमंडळाला न विचारता पंडित नेहरूंनी आपल्या अखत्यारीत मुंबई पाच वर्षांपर्यंत केंद्रशासित करण्याचा निर्णय दिला. मुंबई शहरात मराठी लोकांवर गोळीबार करून त्यांना कुत्र्यासारखे मारण्यात आले असता त्याची न्यायालयीन चौकशी करण्याला पंडित नेहरूंनी साफ नकार दिला. तेव्हा मंत्रिमंडळातील अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकून देऊन रामशास्त्री प्रभुण्यांच्या निःस्पृहतेने कडाडले की, “तुम्ही शुद्ध हुकूमशहा आहात. महाराष्ट्राबद्दल तुम्हा राज्यकर्त्यांच्या मनात वैरभाव आहे!” औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून मराठीपणाची जी बिजली कडाडली अगदी तीच आकाशवाणी पंडित नेहरूंच्या दिल्ली दरबारात चिंतामणराव देशमुखांच्या मुखातून धडाडली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही वेळोवेळी आपल्या ठाकरी भाषेतून मराठी अस्मितेचा एल्गार केला. दै. ‘सामना’ आणि ‘मार्मिक’च्या माध्यमातून मा. बाळासाहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठीपण जपण्यासाठी चौफेर प्रहार केला. यालाच आम्ही ‘महाराष्ट्राची अस्मिता’ किंवा ‘मराठीपण’ म्हणतो. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले, त्या सर्वांच्या चरित्रांमधून हे मराठीपणाचे सूत्र एखाद्या विद्युल्लतेच्या प्रवाहाप्रमाणे अखंडपणे वाहत असलेले आढळून येईल. हा मराठीपणाचा देदीप्यमान धागा छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत अव्याहत चालत आलेला आहे…
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी