पहिली निवडणूक

पहिली निवडणूक

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेमुळे मराठी माणसात नवे चैतन्य निर्माण झाले. आतापर्यंत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली नव्हती. परंतु १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. शिवसेना विरोधकांनी टीका केली, काँग्रेसचे बटीक म्हटले, परंतु कम्युनिस्ट व्ही. के. कृष्ण मेननला पाडायचेच हा शिवसेनेचा निर्णय पक्का होता.
गावदेवी मैदान, ठाणे येथील जाहीर सभेत स. गो. बर्वे यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहणार असे मा. शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले. ‘ज्या मेननने महाराष्ट्राचा आवाज कधी उठवला नाही, ना मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून खटपट केली, ना गोव्याबद्दल एका शब्दाने साथ दाखवली किंवा बेळगाव-कारवार हे महाराष्ट्राचे आहेत म्हणून कधी आवाज उठवला, अशा उपऱ्या मेननला मराठी माणूस मत देणार नाही,’ असा विश्वास व्यक्त केला. श्री. स. गो. बर्वे यांचे मनःपूर्वक कौतुक केले. हा मनुष्य अर्थशास्त्राचा पंडित आहे, कर्तबगार प्रशासक आहे, हाडाचा महाराष्ट्रीय आहे, त्यांचा नावाला पैशाच्या लफड्याचा कलंक नाही. ज्या वेळी मुंबई राज्याच्या मालमत्तेचे गुजरात-महाराष्ट्रात वाटप झाले, त्या वेळी बर्व्यांनी बजावलेली कामगिरी सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावी लागेल, म्हणूनच मेनन यांना पाडून बर्वे यांना निवडून आणणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनाप्रमुखांनी केले.
ज्या वेळी निकाल जाहीर झाले तेव्हा स. का. पाटील या मुंबईच्या अनभिषिक्त राजाचा जॉर्ज फर्नांडिसने पराभव केला. कॉ. डांगे यांनी महेंद्र या उद्योगपतीस लोळवले, तर आर. डी. भंडारे यांनी आचार्य अत्र्यांना आडवे केले. उपनगरात गोखले जिंकले व कांतिलाल शहा यांचा पराभव झाला. मात्र या सर्वांत कडवी झुंज कृष्ण मेनन आणि बर्वे यांच्यात झाली आणि मेनन यांना पाडून बर्वे विजयी झाले.
३० एप्रिल १९६७ च्या “हा राष्ट्रप्रेमी लोकांचा विजय” या लेखात ‘मार्मिक’ने म्हटले आहे, “कृष्ण मेननचा भोपळा आपटला. चला, मुंबईपुरते तरी एका उन्मत्त व्यक्तीचे अघोर राजकीय जीवन संपले. मेननला उन्माद चढला होता. तो उन्मत्तपणे वागत होता, हे सारे खरे. पण उन्माद अनाठायी नव्हता. कोणत्याही माणसाला माज चढावा असे गुण देवाने त्याला दिले होते. अचाट बुद्धिमत्ता, अफाट वक्तृत्त्व, त्याच्या जोडीला पंडितजींची कृपा त्याच्यावर झाली नि हे भाग्याचे रसायन अधिकच फुलले आणि त्यातूनच मेननच्या उन्मादाची पहिली धार तयार झाली. विद्या सिद्ध व्हायची असेल तर अहंकाराचा लोप झाला पाहिजे असे म्हणतात. मेननच्या बाबतीत अहंकाराचा लोप कधीच झाला नाही. उलट जसजसे यश मिळत गेले तसतसा त्याचा अहंकार फोफावत गेला. तो कुणालाच जुमानीत नसे. मेननला भारतीय राजकारणात भलतेच यश मिळाले आणि मेननचे हात आभाळाला पोहोचले. हे यश आपलेच आहे या थाटात तो बेदरकारपणे वागला. पंडितजींनी त्याला पदरात घेतले होते म्हणून त्याला नसते मोठेपण आले ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नाही. त्याला वाटले हे सारे यश माझे. याचा जो परिणाम व्हावयाचा तो झाला. त्याची परिणती म्हणजे मेननचा पराभव होय.”
श्री. सदाशिवराव बर्वे यांच्या विजयाचा आनंद मात्र त्यांना उपभोगता आला नाही. त्यांचे दिल्लीत आकस्मिक देहावसान झाले. केवळ महाराष्ट्र नाही तर सारा देश बर्वे यांच्याकडे आशेने पाहत होता. आचार्य अत्रे यांनी स. गो. बर्वे यांच्या निधनानंतर त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांना ‘विजयाची कवचकुंडले द्या’ असे आवाहन केले आणि त्याच वेळी राष्ट्रद्रोही मेननना ‘अंड्यांची कवचे द्या’ असेही आवाहन केले. लोकांनी शिवसेनाप्रमुखांचे म्हणणे ऐकले आणि ताराबाई सप्रे निवडून आल्या.
मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध लढणारी शिवसेना आपल्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे पहिल्यापासून कम्युनिस्टविरोधी होती. २८ डिसेंबर १९६७ रोजी सर्वश्री मनोहर जोशी व दत्ताजी साळवी यांची जाहीर सभा शिवडीतील गाडीअड्डा येथे शिवसेनेच्या प्रचारासाठी झाली. ती सभा संपल्यानंतर परत येताना या दोघांच्याही लक्षात आले की, परळ नाक्यावरील कम्युनिस्टांचे गिरणी कामगार युनियनचे कार्यालय असणारी दळवी इमारत जाळण्यात येत होती. ही आग जर जास्त पसरली असती तर दळवी इमारतीमधील इतर रहिवासीसुद्धा अडचणीत आले असते. दळवी इमारतीच्या आगीमुळे मुंबईतील कम्युनिस्ट पक्ष हादरला. पण त्याचबरोबर शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. त्याच वेळी मुंबई शहरात शिवसेना व साम्यवादी पक्षाच्या झटापटी सुरू झाल्या. अंधेरी आणि शिवडीच्या साम्यवादी पक्षाच्या सभेमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला. त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. कॉ. भाई घुमे यांनी हे सर्व हल्ले पूर्वनियोजित असल्याचा आरोप शिवसेनेवर केला.
कम्युनिस्ट पक्षाच्या कचेरीवरील हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी भरलेली सभा शिवसेनेच्या अनुयायांनी तासाभरात पुरती उधळली आणि सभा उधळल्यानंतर परतणाऱ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना गोखले सोसायटी लेनच्या तोंडाशी रोखून धरले. त्यानंतरची पाच मिनिटे उभय गटांत तुंबळ युद्ध माजले आणि या झटापटीत दगडविटा, लाठ्याकाठ्या आणि अॅसिड बल्बचा उभय पक्षांनी सर्रासपणे वापर केला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार व अश्रुधुराचा मारा करून प्रक्षुब्ध जमावाची पांगापांग करावी लागली. ही घटना २९ डिसेंबर १९६७ रोजी घडली. याच सुमारास भोईवाड्याच्या मैदानावर शिवसेनेसंबंधीचा एक सर्वपक्षीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रा. माधव मनोहर होते. सुरुवातीस शिवसेनेतर्फे श्री. प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली. त्यानंतर श्री. वामनराव परब (जनसंघ), श्री. वि. कृ. टेंबे (काँग्रेस), श्री. सूर्यकांत क्षीरसागर (उजवे कम्युनिस्ट), श्री. प्रभाकर संझगिरी (डावे कम्युनिस्ट) आणि श्री. विनायक भावे (जनता आघाडी) यांनी आपल्या भाषणांतून शिवसेनेवर यथेच्छ तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या आरोपांनी प्रक्षुब्ध होऊन शिवसैनिकांनी सर्वांचा धिक्कार केला आणि शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. माधव मनोहरांनी कसेबसे आपले भाषण आटोपले. शिवसैनिकांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि शिवसेनाविरोधी परिसंवाद संपुष्टात आला.  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी