साहेबांविषयी

साहेबांविषयी

शरद पवार
महाराष्ट्राच्या समाजमनावर जबरदस्त ठसा उमटविणारे कर्तृत्व श्री. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. आमचे मतभेद असले, मतभिन्नता असली तरी महाराष्ट्राचा इतिहास कधी लिहिला जाईल, तेव्हा बाळासाहेबांशिवाय तो पूर्ण होणार नाही, अशी मुक्तकंठाने प्रशंसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘बाळ केशव ठाकरे – अ फोटोबायोग्राफी’ या शिवसेनाप्रमुखांच्या चित्रचरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात केली. तेव्हा समस्त मराठीजनांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बाळासाहेबांसारखा दिलदार विरोधक मला राजकारणात दिसत नाही, असे दिलखुलास उद्गार पवार यांनी काढले.
आज हा आगळावेगळा समारोह आहे. मी विचार केला, आपण काय बोलायचे! आम्ही दोघे एकमेकांबद्दल विरोधात भरपूर बोललो आहोत. माझी कदाचित पुणेरी भाषा असेल तर बाळासाहेबांची अस्सल ठाकरी भाषा. पण शब्द निवड करताना ते मागे-पुढे पाहात नाहीत. काटकसर करत नाहीत. अचूक व मुक्तहस्ते शब्दांचा वापर करण्यात बाळासाहेबांचा हात कुणी धरणार नाही.
बाळासाहेबांच्या सडेतोड विचारांबद्दल पवार म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षात अनेक संघर्ष झाले. अनेक वेळा आम्ही एकत्रित बसलो. विविध प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा केली. पण बाळासाहेबांनी त्यांची रोखठोक मते कधी लपवून ठेवली नाहीत.’
पवार यांनी आपल्या भाषणाच्या ओघात बाळासाहेबांच्या  शिवतीर्थावरील पहिल्या सभेची आठवण सांगितली. मला आठवतं, त्यांची पहिली शिवतीर्थावरील सभा. मी ती सभा पाहिली. रामराव आदिक स्टेजवर होते. संघटनेच्या निर्मितीसंदर्भात ते बोलत होते. बी. के. देसाई हे माझे एक मित्र व ते बाळासाहेबांचेही मित्र. आम्ही दोघांनी ती सभा ऐकली. तेव्हा देसाई मला सांगत होते, ही सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणावर जबरदस्त ठसा उमठविण्याचं कर्तृत्व या व्यक्तिमत्त्वात आहे. शिवसेनेच्या आंदोलनाचा फटका मलाही बसलेला आहे, असेही पवार यांनी प्रांजळपणे नमूद केले.
आम्ही एकत्र आलो म्हणून वैचारिक मतभेदातले अंतर दूर झाले असं मी म्हणणार नाही. आम्हा लोकांची मतं ठाम आहेत. तशीच ती बाळासाहेबांची आहेत. पण एक गोष्ट मात्र मला सांगावीच लागेल, व्यक्तिगत जीवनात सहकार्याची व अगत्याची भावना असलेला बाळासाहेबांसारखा माणूस मी पाहिला नाही. अशी माणसं क्वचितच भेटतात. मीनाताई आज नाहीत. पण मातोश्रीवर गेल्यानंतर जेवणात भरलेला मासा हा असायलाच हवा. उत्तम जेवण होतंय की नाही यावर बाळासाहेबांचा कटाक्ष असे. पाहुण्यांना आनंदाने घरी परतविण्यात त्यांना आनंद वाटतो. विलक्षण लोभनीय व्यक्तिमत्त्व, असेही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘संघर्ष होतो. पण त्यात दिलदारपणा असला पाहिजे. बाळासाहेबांमध्ये दिलदार विरोधक मला दिसला.’ संघर्ष करण्यासाठी त्यांची प्रकृती उत्तम राहो. त्यांना दीर्घयुष्य लाभो!
बाबासाहेब पुरंदरे
राजकीय अस्पृश्यता दूर सारा, सर्वांनी एकत्र या
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हिंदुस्थानच्या महाद्वारी झालेल्या आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विभिन्न विचारसरणीच्या लोकांना राजकारणातली अस्पृश्यता दूर करून सर्वांनी एकत्र यावे अशी एक नागरिक म्हणून हाक दिली.
ही वेगवेगळ्या विचारांची मंडळी एकत्र बसून विचार करतील का? असा सवाल करून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, खरंच हा आजचा क्षण ऐतिहासिक आहे. बाळासाहेब ठाकरे हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी बाळासाहेबांकडे जात आलो आहे. राजकारण या एका विषयाशिवाय आम्ही सतत बोलत असतो. बारीक गोष्टींकडे बाळासाहेबांचे लक्ष असते. महाडचा एक प्रसंग आठवतो. मी आणि बाळासाहेब गप्पा मारत होतो. ते गप्पा मारता मारता सहज एका ठिकाणी गेले आणि बेसिनमधला थेंब थेंब पाणी गळणारा नळ त्यांनी बंद केला. प्रसंगावधान त्यांनी दाखवलं ते महत्त्वाचं आहे. पाण्याचं महत्त्व त्यांनी ओळखलं. नाहीतर अनेक वेळा पाहतो. दाढी करता करता बेसिनमधला पाण्याचं नळ चालूच राहतो. तो बंद करण्याचं भानही नसतं.
‘बाळ केशव ठाकरे – अ फोटोबायोग्राफी’ पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आवळ्या भोपळ्याची बांधलेली मोट हा एक चर्चेचाच विषय असल्याचे सांगून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, आज जे सारे एकत्र आहेत ते राजकारणात होईल काय? सगळीकडे तीच चर्चा सुरू आहे. पुण्यातून मी मुंबईत येताच सगळीकडे औत्सुक्याचीच चर्चा होती. या पुस्तकात बाळासाहेबांचे कितीही फोटो समाविष्ट केले तरी पुढे कमी पडतील. खरोखर लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब आहेत. अशा लोकांचे जीवन सर्वसामान्यांना कसे कळणार?
आ. नितीन गडकरी
मराठी माणसांचे शक्तिस्थान
मला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर आहे. माझ्या मनात अटलबिहारी वाजपेयींबद्दल जेवढा आदर आहे तेच स्थान बाळासाहेबांचं आहे. शिवसेनाप्रमुख हे असे एकमेव राजकीय नेते आहेत की, जे जातीयवादापासून मुक्त आहेत. राजकारण आणि जातीय समीकरणे या सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. परंतु बाळासाहेब त्या दबावाखाली कधीच आले नाहीत. कार्यकर्ता, माणूस आणि गुणवत्ता याचा विचार करूनच ते निर्णय घेतात. मराठी माणसाला मिळालेले ते एक शक्तिस्थान आहे आणि मराठी माणसाने त्यासाठी जगन्नियंत्याचे कायम आभार मानावयास हवे!
श्री. शंकर सारडा
एक प्रभावशाली वक्ता
‘काँग्रेस हिंदू महासभा, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष वगैरे स्वातंत्र्य काळातले त त्यानंतर वेगवेगळे अवतार धारण केलेले पक्ष-उपपक्ष राजकीय क्षेत्रात असताना, एका पक्षातून फुटून दुसरा पक्ष काढायचा ही वहिवाट असताना, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी यापैकी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वत:चा पक्ष स्थापन केला हे एक अकल्पित धाडसच होते. एक राजकारणी व्यक्ती यापेक्षा एक कलावंत, एक सहृद्य संवेदनशील माणूस आणि जनमानसाला हेलावून सोडणारा एक प्रभावशाली वक्ता म्हणून बाळासाहेबांची महता जास्त जाणवते.
अशोकजी परांजपे
एक अनोखं व्यक्तिमत्त्व
‘मुंबईत कुठलाही परप्रांतीय समांरभ असो, तिथं मराठी माणूस गेला तर तो डावलला जात नाही. त्याची दखल अगदी आवर्जून घेतली जाते. हिंदी अभिनेता, नेता, प्रणेता कुणीही असो, मराठी त्याच जागी व तसाच कार्य करणारा माणूस त्याच योग्यतेचा समजला जातो. याचे श्रेय इतर मराठी राजकीय पक्षांनीही बाळासाहेबांसारख्या चौफेर नेतृत्वाला दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे ही अशी एक शक्ती आहे, अशी उमेद आहे की, ती राष्ट्रबांधणीला व समाजबांधणीला अत्यंत उपकारक आहे. एखादा राजकीय पक्ष, संघटना हे त्यांच्या कर्तृत्वाला फारच तोकडे असे ध्येय आहे. सारे राष्ट्र जागे करण्यात, एकसंध ठेवण्याची हिंमत आणि कर्तृत्व त्यांच्यात आहे.
मंगेश तेंडुलकर
सहजता आणि उत्स्फूर्तता व्यंगचित्रात दिसते
‘हातात ब्रश, उगाळून ठेवलेली काळी शाई आणि पायाचा इझेल करून त्यावर ठेवलेल्या पाटावर ड्रॉईंग पेपर घेऊन व्यंगचित्र चितारताना बाळासाहेबांना पाहिले आणि बरेच काही शिकलो. तल्लख मेंदूची, प्रतिभेची आणि निर्दोष काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर ब्रश धरलेला हात आपोआप निर्मिती करत जातो. काटेकोरपणापेक्षा सहजता आणि उत्स्फूर्तता इथे अधिक महत्त्वाची असते. या उत्स्फूर्ततेचे अनोखे दर्शन तेव्हा बाळासाहेबांच्या हातातल्या ब्रशने घडवले. बाळासाहेबांनी पुन्हा व्यंगचित्रे चितारायला सुरुवात करावी. त्यांच्या भाषणातून ते मुंबईकरांशी थेट बोलतात, पण मुंबईबाहेरच्या माणसांसाठी व्यंगचित्रांच्या भाषेतून त्यांचे विचार सर्वदूर पोहचू शकतील याची आज गरज आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप
मानाचा मुजरा
‘मराठी ही भाषा आहे, जात नाही. पण बाळासाहेबांविषयी असूया बाळगून असलेल्या काही कारट्यांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला बदनाम केले. ती जात्यंध असल्याचा प्रचार केला. पण मला तरी शिवसेना जात्यंध असल्याचे आढळले नाही. शिवसेना खरेच तशी असती तर तिने मागास समाजातील शिवसैनिकांना एकाही निवडणुकीचे तिकीट दिले असते काय? तिकीट देताना बाळासाहेबांनी जात पाहिली नाही, तर त्याची भाषा पाहिली. राखीव नसलेल्या मतदारसंघातून त्याला तिकीट देण्याचे धाडस केले. इतकेच नाही तर त्या उमेदवाराला निवडूनही आणले. जात-पात न मानणाऱ्या बाळासाहेबांना मानाचा मुजरा!
अरुण साधू
मास लीडर
‘मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रात शिवसेना वाढली. सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात शिवसेनेने आदराचे, आपुलकीचे स्थान मिळवले. ही संपूर्ण शिकवण बाळासाहेबांची आहे. त्यांना प्रबोधनकारांची पार्श्वभूमी आहे. प्रबोधनकार ठाकरे हे स्वत: निश्चयी, विज्ञानवादी होते. जाती-पातीचा विचार त्यांनी कधीच केला नाही. बाळासाहेबांमध्येही जातीपातीचा विचार शून्य आहे.
गेल्या ३०-४० वर्षात महाराष्ट्राला लाभलेला, जनतेच्या हृदयांना आणि भावनांना हात घालणारा एकमेव आणि सडेतोड भाषेत बोलणारा अखेरचा ‘मास लीडर’ अशीच बाळासाहेबांची माझ्या मनात प्रतिमा आहे. महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या रूपात प्रबोधनकारांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे.
बापू नाडकर्णी
दोस्ताना असावा असा
‘बाळासाहेबांचे क्रिकेटवरील प्रेम सर्वश्रूत आहे. क्रिकेटबद्दल त्यांच्यात ‘क्रेझी मॅडनेस’ त्या वेळी होता. क्रिकेटमधील घडामोडींबाबतचे त्यांचे ज्ञानही अफलातून असे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या उभारणीस त्यांनी दिलेला पाठिंबा सर्वश्रूत आहे. त्या वेळीही वानखेडेवरील मॅच पाहण्यासाठी ते सहकुटुंब यायचे.
दोन वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी आम्हा जुन्या क्रिकेट दोस्तांसाठी वांद्र्याच्या एम.आय.जी. क्लबवर खास गप्पांची मैफल आयोजित केली होती. ही मैफल म्हणजे जणू यादोंकी बारातच होती. माझ्यासमवेत या मैफलीत पॉली उम्रीगर, एकनाथ सोलकर, चंदू बोर्डे, अजित वाडेकर, माधव आपटे होते. पॉलीवर बाळासाहेबांचे अपार प्रेम होते. जात-धर्म यापलीकडे नितळ मनाने मैत्री जपणारे बाळासाहेबांसारखे दोस्त लाभणेही भाग्यच असते.
अमिताभ बच्चन
बालासाहब मेरी जीवनकी शक्ती है…!
आजवर जेव्हा जेव्हा माझ्यावर विघ्नं आली, माझी मन:स्थिती अस्थिर झाली, मनोबल खचून गेलं तेव्हा तेव्हा बाळासाहेबांची एक भेट किंवा फोन माझ्या जीवनात जादूची कांडी फिरवतात. हा माझा दीर्घ अनुभव आहे.
मी जीवनात अनेक वेळा हताश झालो. तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो. त्यांनी प्रत्येक वेळी धीर दिला. त्यांची एक शिकवण मी कधीही विसरलेलो नाही. तुमच्या मनात क्लेश नसेल, हृदय साफ असेल, प्रामाणिकपणा असेल तर कोणी तुमचे काही बिघडू शकत नाही. ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली व माझ्या संकटकाळात त्यामुळे मी सहीसलामत बाहेर पडलो. बालासाहब मेरी जीवनकी शक्ती है।
देव आनंद
अनमोल ठेवा
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि माझी मैत्री शब्दांच्या बंधनात अडकवावी अशी नाही. आमच्या दोघांच्या स्वभावातही जमीन आसमानाचं अंतर आहे. पण दोन ध्रुवांवर राहूनही आमच्यात स्वच्छ निकोप मैत्री आहे. बाळासाहेब खरे देशभक्त आहेत. मला राजकारणात स्वारस्य नाही. मी त्यांच्याकडे माझा सच्चा मित्र, एक संवेदनशील व्यक्ती, उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून पाहतो.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी