उद्धवजी- बाळासाहेबांबद्दल

उद्धवजी- बाळासाहेबांबद्दल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानं महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं हे शिवसेनाप्रमुखांच्या जाण्याने लक्षात आलं. महाराष्ट्राचं आणि देशाचं कधीही भरून न येणारं असं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण समाजावरचा हा आघात आहे. यात लहान-मोठा, छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत हा भेदभाव नाहीच. सगळ्यांचंच दु:ख सारखं होतं. आपल्या कुटुंबातलं कोणीतरी गेलं, याच भावनेतून त्या दिवशी आकांत उडाला होता. सगळे हादरून गेले होते. तो धक्का पचवणं कठीण होतं. मुळात साहेब नाहीत हे ‘पटवून’ घेणं शक्य होत नाहीय. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या जाण्याने हबकलेल्या मराठी माणसाला व शोकमग्न शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधार दिला आहे.
उद्धवजी साऱ्या शिवसैनिकांना विश्वास देताना म्हणतात की, कोण म्हणतंय बाळासाहेब आपल्यातून गेले? ते आपल्यातच आहेत. आपली परीक्षा घेत आहेत. बाळासाहेबांनी आपल्याला मोठी ताकद दिली. त्या ताकदीच्या बळावर शिवसेना उभी आहे. बाळासाहेबांच्याच मार्गावरून शिवसेना पुढे जाईल. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढत राहील. जे झालं, संकट कोसळलंय त्याचं वर्णन नाही करता येणार. ज्या भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत, त्याचं वर्णन करता येणार नाही. ‘पोकळी’ हा शब्द इकडे अपुरा आहे. आतापर्यंत अशा अनेक पोकळ्या निर्माण झाल्या. आपण प्रत्येक वेळेला अनुभवत गेलो. त्यातून सावरलो. पण आता आपण जे काही अनुभवतोय ते ‘पोकळी’पलीकडचे आहे. जगाच्या दृष्टीने म्हणाल तर सावरावं लागेलच. परंतु मला ‘माँ’ गेल्यानंतरची आठवण येते. तेव्हा शिवसेनाप्रमुख स्वत: म्हणाले होते, माशाचे अश्रू दिसत नाहीत, काही वेळेला हे दु:ख गिळावं लागतं किंवा गिळल्यासारखं दाखवावं लागतं. हे दु:ख तर कायमचे राहणार. अजूनही ज्या वेळेला एकटा बसतो त्या वेळेला आठवणी दाटून येतात. बाळासाहेब सोबत आहेत असेच वाटते आणि त्यांना भेटण्याची ओढ दाटून येते. माझ्याप्रमाणेच लाखो चाहत्यांनाही हीच ओढ असणार!
मी आता खंबीरपणे उभा आहे. मी त्यांचा मुलगा म्हणून, हे माझं पुत्रकर्तव्य म्हणून मी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. जनतेला हेच सांगण्यासाठी मी आता महाराष्ट्रात फिरणार आहे. राज्यातील प्रत्येक विभागात मी जाणार आहे.
बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी म्हणा, मानवंदना देण्यासाठी म्हणा, जो जनसागर इकडे आला होता तो फक्त आठ-दहा तासांत इकडे पोहोचला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे लोक आले होते. अनेक माणसं घरात बसून अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. त्यांना मुंबईत यायचे होते, पण पोहोचू शकले नाहीत. या सगळ्यांना मला नमस्कार करायचा आहे आणि त्यांना मी दिलासा देणार आहे.
बाळासाहेबांनी एवढी ताकद आपल्या मागे उभी केली आहे, ही ताकद मी काही वाया जाऊ देणार नाही आणि त्यांचं एकही स्वप्न, एकही इच्छा ते असतानाही मी अधुरी राहू दिलेली नाही आणि त्यांनी जे स्वप्न दाखवलेलं आहे, भगवा फडकविण्याचं, भगवा फडकवणं म्हणजे नुसता भगवा फडकवणं नाही, तर भगवा फडकवण्यामागचा जो हेतू आहे तो म्हणजे महाराष्ट्राला सामर्थ्यवान बनवणं, महाराष्ट्राचा विकास घडवणं, जनतेला सुखासमाधानाचे दिवस दाखवणं, हे सगळं त्या ‘भगवा फडकवणे’ या शब्दांत सामावलेलं आहे. नुसतं जिंकलो आणि सोडून दिलं असं नाही. बाळासाहेबांच्या या स्वप्नासाठी मी दिवस-रात्र मेहनत करीन. आकाश-पाताळ एक करीन आणि मी ते पूर्ण करीनच करीन. असं वचनच मी शिवसेनाप्रमुखांना दिलेलं आहे. आजही आपल्या माध्यमांतून मी पुन्हा हेच वचन देतोय. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमा भागातील मराठी बांधवांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख हा नेहमीच आधार राहिलेला आहे आणि तो आधार मी कधीच तुटू देणार नाही.
बाळासाहेबांनी आपल्याला ‘शिवसेना’ हा एक विचार दिलेला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांमध्ये आणि हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. बाळासाहेब ही ताकद आपल्याला कायमची देऊन गेलेले आहेत. ती ताकद आपण ओळखली पाहिजे आणि त्या ताकदीचाच मी उपयोग करणार, तो मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या भल्यासाठी.
मी माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार आहे. बाळासाहेबांनी जे विचार दिले आहेत, जी कामे आखून दिलेली आहेत त्यातून मी एक तसूभरही मागे हटणार नाही. बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरूनच जाणार. मग तो भूमिपुत्रांचा लढा असेल, मराठी अस्मितेचा लढा असेल, मुंबईचा लढा असेल, देशाचा विचार केला तर हिंदुत्वाचा; बांगलादेशी घुसखोरांचा आणि इस्लामी धर्मांधतेविरुद्धचा लढा असेल. हिंदुत्वाचा विचार आता अनेकांना पटायला लागला आहे. बाळासाहेबांनी कोणतंही सत्तापद हातात नसताना देशाचा विचार केला. माझं काय होईल ही चिंता त्यांनी कधी केली नाही. अशा वेळेला त्यांनी जे काही धैर्य आपल्याला दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. जगभरात त्यांना एवढी मान्यता का मिळाली? तर त्यांचं धाडस, त्यांचे स्पष्ट विचार. त्यांचे मोठेपण मानणारे लोक कितीतरी पटीने आहेत.
मी बाळासाहेबांनी दिलेल्या हिमतीच्या जोरावर आज उभा आहे. एक मोठी जबाबदारी त्यांनी आपल्यावरती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की, बाळासाहेब कदाचित आपली परीक्षा बघत असतील की, अरे मी आयुष्य वाहिलंय यांच्यावरती. शिवसैनिक म्हणून मी या ज्या पिढ्या उभ्या केल्या ती पिढी रडणारी आहे की लढणारी आहे, हे ते नक्कीच बघत असतील. मला नाही असं वाटत की बाळासाहेब आपल्यातून गेलेले आहेत. ते आपली परीक्षा घेताहेत. त्या वेळी आपल्या सगळ्यांची भावना काय आणि माझीही भावना तीच होती की, बाळासाहेब परत या! परत या!!! जर आपण त्यांना परत बोलावणार असू, तर त्यांनी लढणाऱ्यांसाठी यावं की रडणाऱ्यांसाठी यावं? म्हणून मी हिमतीने सांगतोय, आता लढायला उभे राहा. लढाई मोठी आहे आणि ती लढाई बाळासाहेबांनी दाखविलेला मार्ग, त्यांनी दिलेली हिंमत आणि विचार या जोरावरच आपल्याला जिंकायची आहे आणि ती आपण जिंकणारच.
होय, मी महाराष्ट्रात फिरणार आणि पुन्हा शिवशाही आणणारच. हे मी बाळासाहेबांना दिलेले वचन आहे. तसेच आपण शिवसेनाप्रमुख बनावे हा विचारही माझ्या मनाला कधी शिवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच! तेच शिवसेनाप्रमुख! तेच हिंदुहृदयसम्राट!! या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही. आम्ही आजही मानतो, शिवसेनाप्रमुख आपल्यात आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे असं ते नेहमी म्हणत. शिवसैनिक आजही आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखही आहेत. त्यांची जागा घेण्याची माझी योग्यता नाही. शिवसेनाप्रमुखांची सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी झटेन, हे मात्र नक्की! शिवसेनाप्रमुखांच्या मागे ‘माजी शिवसेनाप्रमुख’ किंवा ‘प्रथम शिवसेनाप्रमुख’ असे निरर्थक शब्द कधीच लागणार नाहीत. ते सदैव आमच्यात आहेत.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी