विचारांचा अंगार

विचारांचा अंगार

माननीय शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वविषयक तेजस्वी विचारहिंदुहृदयसम्राट आदरणीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी साप्ताहिक ‘मार्मिक’, दैनिक ‘सामना’ आणि विविध भाषणांमधून ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ तसेच हिंदूंचा पुरुषार्थ आणि स्वाभिमान जागविणाऱ्या व जात्यंध देशद्रोह्यांच्या हिंदूविरोधी कारस्थानांचा मुखभंग करणाऱ्या काही तेजस्वी विचारांचा हा निवडक गोषवारा. यातील प्रत्येक विचार हा सुविचार आहे. एखादे महन्मंगल स्तोत्र पाठ करावे तसे हे पवित्र आणि तेज:पुंज विचार आहेत…
 • हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांच्याविषयी ज्याच्या मनात आदर असेल आणि या भूमीशी त्यांची बांधिलकी असेल, त्यांना हिंदुत्वाचा अर्थ समजत नाही, असे होणार नाही. आमच्या संकल्पित हिंदू राज्यात सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल. केवळ अमुक धर्माचे आहेत म्हणून, अधिकारी नसताना, ज्यादा सवलती मिळणार नाहीत. हिंदुत्वाची निंदानालस्ती करण्यातच ज्यांचा जन्म गेला, त्यांची मात्र गय केली जाणार नाही. हिंदू धर्म हा मूलत: सनातन म्हणजे शाश्वत धर्म आहे, म्हणून त्यात विचारस्वातंत्र्य अंतर्भूत आहे. या विचारस्वातंत्र्याचाच मधल्या काळात पुष्कळदा गैरवापर झाल्याने, हिंदुस्थानातच ‘हिंदू कोण?’ म्हणून विचारणारे लोक निर्माण झाले.हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असे आमचे मत आहे.
 • ‘होय, हे हिंदू राष्ट्रच आहे’ हे त्रिकालाबाधित सत्य आज भारताला स्वातंत्र्य मिळून ५३ वर्षे लोटली तरी सांगावे लागते, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. पण देशातले एकूण वातावरणच बदलले आहे आणि ‘होय, आम्ही हिंदूच आहोत’ असे ठणकावून सांगण्याची हिंमत नेत्यांच्या ठायी निर्माण झाली आहे, ही आनंदाची बाब आहे. ज्या वेळी लाख-लाख माणसे, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा गगनभेदी घोषणा देतात, त्याचक्षणी आमचे अंत:करण आनंदाने भरून येते, कारण ही भावना राष्ट्रात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जागविण्यात नि प्रज्वलीत करण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही.
 • आज संपूर्ण देशात असे काही अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे की, ज्यामुळे हिंदुत्वाचा विझलेला निखारा, वणव्याप्रमाणे दरी कपारीतून, डोंगरा-डोंगरातून, गावागावातून धगधगू लागला आहे, त्या वणव्याने जे जे म्हणून अमंगल आहे, ते ते भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात आमचा काहीच वाटा नाही, केवळ कुणीतरी फुंकर घालायला हवी होती म्हणून आम्ही फक्त तेवढे केले आणि गवताच्या काडीने डोंगराच्या रांगा पेटाव्यात त्याप्रमाणे हिंदुत्वाच्या विचाराने अखंड हिंदुस्थान आज पेटून उठला आहे.
 • हिंदू धर्माचा भगवा ध्वज जरी आज आम्ही आमच्या खांद्यावर घेतला असला तरी, आम्ही त्यावर कधीच मक्तेदारी सांगणार नाही. या देशात जो जो हिंदू आहे, त्याचा त्याचा या भगव्या ध्वजावर अधिकार आहे. कारण तो त्याचा मानबिंदू आहे, तोच त्याचा त्राता आहे, तोच त्याचा अधिकार आहे, तोच त्याचा भविष्यातील प्रकाश आहे. म्हणूनच या देशातील साऱ्या हिंदूंनी शंभर वर्षाच्या अंधारातून बाहेर पडून त्या ध्वजाच्या प्रकाशात यावे हा आमचा आग्रह आहे. भागवत धर्माचे अधिष्ठान असलेल्या हिंदुत्वाचा ध्वज जोपर्यंत या नभोमंडळात चंद्र, सूर्य आणि तारे आहेत, तोपर्यंत पृथ्वीगोलाच्या पाठीवर मजबुतीने फडकत राहील. कारण हा ध्वज म्हणजे शोभेची वस्तू नसून तीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना दिलेला तो शक्तिशाली आशीर्वाद आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्याची शक्ती त्या ध्वजात असली तरी, तो ध्वज म्हणजे विरक्तीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. सत्तेच्या मागे लागणाऱ्या राज्यकर्त्यांना तो विरक्तीचा ध्वज पेलवला नाही, काळपुरुषाने तो आमच्या खांद्यावर दिला.
  चारशे वर्षापूर्वी वास्को-द-गामाने हिंदुस्थानचा शोध लावला. पण तो हिंदुस्थान खऱ्या अर्थाने कधीच निर्माण झाला नाही. आपल्याला तो हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. हिंदूंचा हिंदुस्थान आणायचा आहे. जेथे हिंदूंचा मान राखला जाईल आणि हिंदुत्वापुढे अहिंदूही नतमस्तक होतील असे राष्ट्र उभे करायचे आहे. त्या हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होण्यासाठी द्वेष आणि मत्सर बाजूला ठेवून हिंदूंनीच हिंदुत्वाची गुढी उभारायची आहे.
 • आमच्या देशात कायदे आणि निर्बंध फक्त हिंदूंसाठी आहेत आणि सवलती मात्र मुसलमानांना देण्यात आल्या आहेत, हे आम्ही किती काळ सहन करायचे? धर्माच्या नावाखाली या देशातील अल्पसंख्याकांनी कोणताही धिंगाणा घालायचा आणि मिंध्या राजकीय पक्षांनी व शासनाने डोळेझाक करायची असे किती काळ चालणार आहे? अल्पसंख्याकांनी काही सवलती द्यायच्या असतील तर जरूर द्या, पण जर त्या देशहिताच्या आणि मानवी हक्काच्या आड येणार असतील तर, कोणताही मुलाहिजा न ठेवता त्या सवलती काढून घ्यायला हव्यात. या देशात सुरुवातीपासूनच राष्ट्र आणि धर्म यांची गल्लत करण्यात आली. त्यामुळेच धर्माच्या नावाखाली राष्ट्रविघातक कृत्ये वाढली. या देशातील प्रत्येक नागरिक प्रथम भारतीय आहे आणि नंतर तो धर्माचा आहे.
 • धर्म ज्याप्रमाणे मुसलमानांचा आहे, त्याचप्रमाणे आमचाही आहे. पण आम्ही तो कधी देशहिताच्या आड येऊ दिला जाणार नाही आणि त्याला कधी काळाच्या वाटेवर अडथळा म्हणूनही उभा केला नाही. हिंदु धर्मात वर्षानुवर्षे सतीची चाल होती. पण मानवी मूल्यांची कदर करून लॉर्ड बेंटिनने सतीविरोधी कायदा केला तेव्हा हिंदूंनी कधी बंड केले नाही, पण शहाबानोला सर्वोच्च न्यायालयाने न्याय देताच सारा मुसलमान समाज ‘शरीयत धोके मे’, ‘इस्लाम खतरे में’, असे म्हणत बंड करून उठला. आमच्यात देखील हुंड्याची चाल होती. कायद्याने ती बंद झाली त्या वेळी हिंदूंनी विरोध न करता उलट स्वागत केले. कारण हिंदू सुसंस्कृत आहेत, समाज डोळस आहे, धर्म डोळस आहे. आम्ही ज्या वेळेला धर्म मानतो, त्या वेळेला राष्ट्राचाही विचार करतो.
 • जोपर्यंत ‘एक देश एक कायदा’ हे सूत्र अमलात येत नाही, तोपर्यंत अल्पसंख्याकांचे हे थेर असेच चालत राहील. त्यातून देशाच्या विघटनाचा धोका आहे. भारतीय घटनेत आवश्यक ते बदल करावेत, पण कोणत्याही परिस्थितीत या निधर्मी देशात एकाच धर्मावर आधारित असलेल्या इतर कायद्याला स्थान असता कामा नये. या देशात कोणी कोणत्याही धर्माचा असो, हिंदू असो, मुसलमान असो, बुद्ध असो, ख्रिश्चन असो, त्यांनी आपला धर्म घरात आणि धर्मस्थानात जोपासावा. पण इतरत्र मात्र त्यांना एक भारतीय म्हणून भारतीय घटनेपुढेच नतमस्तक व्हावे लागले.
 • आमच्या दृष्टीने या देशात फक्त दोन जाती आहेत, एक हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानद्रोही. यापलीकडे या देशात आमच्या दृष्टीने अन्य जात उरलेली नाही. त्यामुळे आपण कोणत्या जातीत बसायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. जे हिंदुस्थानी असतील त्यांना या देशाचे कायदेच नव्हे तर रीतीरिवाजही पाळावे लागतील, या देशाची संस्कृती मानावी लागेल, परंपरेचा मान राखावा लागेल. इतकेच नव्हे तर, हिंदू धर्म हा या देशाचा प्रधान धर्म आहे, याचीही जाणीव ठेवायला लागेल. ज्यांना हे मान्य नसेल त्यांना, या देशात राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. एक तर तुम्ही हिंदुस्थानी म्हणून या देशात राहा अन्याथा या देशातून चालते व्हा.
 • जेथे जेथे हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते तेथे तेथे शिवसेना हा हिंदूंचा एकमेव आधार ठरतो. या हिंदूंशी शिवसेना कधी प्रतारणा करु शकणार नाही. शिवसेना हा केवळ पक्ष नाही. तो एक वृक्ष आहे, सर्व देशभर झपाट्याने पसरलेला विचार आहे. या विचाराची मशाल दैवाने आमच्या हाती दिली आहे. आम्ही ही मशाल हाती घेऊन सांगतो आहोत की, हिंदू एकवटल्याशिवाय या देशाला तरणोपाय नाही, हा एकवटलेला हिंदू प्रांतवादी नसेल, जातीयवादी नसेल, इतर धर्मीयांचा देखील तो आदर राखेल, पण जे धर्माच्या नावाखाली या देशाच्या मुळावर येतील त्यांना, हा हिंदू क्षमा करणार नाही.
 • या देशातील हिंदूंवर जेव्हा हिंदू म्हणून हल्ले होतात तेव्हा, या देशातील हिंदू केवळ मनगटे चावत बसणार नाहीत. या देशातील हिंदू आम्हाला जगवायचा आहे आणि चेतवायचा आहे. कोणाच्या विरोधात नव्हे तर, प्रखर राष्ट्रीय भावनेने त्याला उभा करायचा आहे. त्यासाठी हिंदूंतील हिंदुत्व टिकायला हवे त्याच्या अस्मितेची ज्योत प्रज्वलित व्हायला हवी. म्हणून आम्ही कंठशोष करून सांगत असतो की, या देशातील हिंदू वाचवा आणि त्यांच्यातील हिंदुत्वाचा अभिमान जागा करा.
 • इतर धर्मीय त्यांच्या धर्माचा अभिमान बाळगतात, त्याचप्रमाणे आम्हीही हिंदू धर्माचा अभिमान बाळगला तर त्यापासून जगातील कोणतीही शक्ती आम्हाला परावृत्त करू शकणार नाही. कारण कोणत्याही धर्माचा अभिमान बाळगणे म्हणजे इतर धर्माचा द्वेष करणे ही आचारनीती आम्हाला मान्य नाही. त्यामुळे या देशातील हिंदूंनी एकवटावे याचा अर्थ त्यांनी इतर धर्मीयांच्या विरोधात उभे राहावे, असा होत नाही.
 • सर्वधर्मसमभावाचा अर्थ तरी काय? राष्ट्रवादाचे धडे फक्त शिवसेनेला द्यायचे आणि मुसलमान जेव्हा त्या राष्ट्रवादाचा खून पडतात तेव्हा गुडघे टेकायचे, ही नीती कोणत्या सर्वधर्मसमभावात बसते? मुसलमानांनी आपल्या मशिदीवर बांगचे भोंगे लावायचे आणि हिंदूंनी मात्र मशिदीवरून जाताना चिपळ्याही वाजवायच्या नाहीत हा सर्वधर्मसमभाव आहे काय? या देशातील सारी मंदिरे भुईसपाट करून तेथे मशिदी बांधायच्या याला सर्वधर्मसमभाव म्हणतात काय? हजरत बाल असो की, रामजन्मभूमी असो, मुसलमानांनी धर्माच्या नावाखाली उठाव करायचा आणि हिंदूंनी मात्र हिंदू हा शब्दही उच्चारायचा नाही, हा सर्वधर्मसमभाव आहे की काय?
 • या देशाची फाळणीच मुळी हिंदू आणि मुसलमान या तत्त्वावर झाली आहे. हे मुसलमानांनाच नव्हे तर, हिंदूंनाही सांगण्याची वेळ आली आहे, हेच या देशाचे दुर्दैव आहे. हिंदूंचा स्वाभिमान खच्ची होत चालला आहे. कारण ते हिंदू आहेत. मुसलमान धर्माच्या छ्त्राखाली एकवटत आहेत. कारण ते मुसलमान आहेत. हिंदूंची संख्या कमी होत असताना मुसलमान तीन कोटीचे तेवीस कोटी झाले, याचेही कारण ते मुसलमान आहेत. त्या मुसलमानांना कुणीतरी सांगायला हवे की, तुम्ही मुसलमान असलात तरी या देशाचे नागरिक असल्याने तुमच्या किंवा तुमच्या धर्माच्या अस्तित्वाला येथे कुठलाही धोका नाही. मुसलमानांना हे माहिती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी आणि धार्मिक नेतृत्व टिकवण्यासाठी जात्यंध मुसलमान पुढारी, आपण मुसलमान आहोत म्हणून हिंदुस्थानात आपल्यावर अन्याय होतो अशा प्रकारे अपप्रचार करून सर्वसामान्य मुसलमानांना भडकावीत असतात.
 • जातीय दंगली या देशाला परवडणाऱ्या नाहीत. हिंदू आणि मुसलमानांचेही हित त्यात नाही. त्यामुळे सारा देश पोखरला जाईल. पाकिस्तानासारख्या हिंदुस्थानच्या शत्रूला नेमके हेच हवे आहे. पाकिस्तानाला भारतातील मुसलमानांविषयी, यत्किंचितही प्रेम नाही. त्याला हा हिंदुस्थान उद्ध्वस्त झालेला पाहायचा आहे. आम्हाला अनेकदा वाटते की, हजारो मुसलमानांना भेटावे, विश्वासात घेऊन सांगावे की, “आपण हिंदू-मुसलमान सारे एक आहोत, आपला धर्म कोणताही असला तरी, आपण भारतीय आहोत. हा देश हिंदू असला तरी, इथे द्वेष मुसलमानांचा नाही. तुम्हाला भडकविणाऱ्या नेतृत्वाला बाजूला सारा आणि तुमच्यात असलेल्या राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे मजबुतीने उभे राहा, आपण सारे या देशाचे नागरिक म्हणून अंतर्बाह्य संकटाशी एकवटून मुकाबला करू या.”
 • तीनशे वर्षानंतर महाराष्ट्रात फडकणाऱ्या त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या या भगव्या ध्वजास अभिवादन करण्यासाठी सिद्ध व्हा, भगव्या ध्वजाला वंदन करा. आता भगव्या ध्वजाला थांबायला वेळ नाही. तो एका जागी थांबणार नाही. शिवसैनिक तो खांद्यावर घेऊन पूर्वेला जाणार आहे. पश्चिमेला जाणार आहे, उत्तरेला जाणार आहे, दक्षिणेला जाणार आहे, सह्याद्रीवर जाणार आहे, हिमालयावर जाणार आहे. साऱ्या धर्मातील सर्वश्रेष्ठ हिंदू धर्माचे हे निशाण हिंदुस्थानच्या राजधानीतील लाल किल्ल्याच्या बुरुजावर तिरंग्याला साथ देण्यासाठी मजबुतीने रोवतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणार आहे. हे महान, ऐतिहासिक कार्य शिवसैनिकांच्या हातून घडावे ‘ही त्या श्रींची इच्छा आहे’.”
 • आज धर्माचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन, जो धर्माचे रक्षण करणार नाही त्याला, स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकारच राहणार नाही. शेवटी धर्म म्हणजे काही पिढीजात मालमत्ता नाही किंवा बँकेतील ठेवही नाही. धर्म म्हणजे उदात्त भावना असते, ती भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. हिंदूना हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार अबाधितच राहिला पाहिजे.
 • हिंदुत्वाची मशाल आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात प्रज्वलित झाली आहे. हिंदूंनी हिंदूंचे हिंदूंसाठी उभारलेले हे हिंदुत्वाचे अपूर्व आंदोलन आहे. त्या आंदोलनात महाराष्ट्राने पुढाकार घेतल्याने प्रत्येक हिंदू धर्माभिमानी मराठी माणसाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. हिंदुत्वाचे हे निर्वाणीचे युध्द लढले जात असताना शिवसेनेने अर्जुनाची भूमिका घेतली आहे. आता साऱ्या हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकवटायला हवे. एकाच सुरात बोलायला हवे. एकाच ध्येयाने वेडे व्हायला हवे. आम्ही आमच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा ध्वज हाती घेतलेला नसून आज आमचे राजकारण शिवसेनेसहीत हिंदू धर्माच्या चरणी अर्पण केले आहे.
 • हिंदू धर्माला एक श्रेष्ठ परंपरा आहे. त्या परंपरेत दिव्यत्वाची प्रचीती आहे. ती परंपरा जोपासण्यासाठी अनेक साधुसंतांनी आपले जीवन अर्पण करून ते समाधीस्थ झाले. श्रीकृष्णाची गीता, तुकारामाची गाथा, रामदासांचे दासबोध, नामदेवांचे अभंग, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, मीराबाईच्या ओव्या आणि वाल्मिकीचे रामायण याच परंपरेच्या चरणी भक्तिभावाने वाहिले गेले. म्हणून आपला धर्म आणि दैवते घराघरातून पोहोचली. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जा. आपल्या देशात जेवढे देव्हारे आढळतील तेवढे इतरत्र कोणत्याही देशात, घरात आढळणार नाहीत. कारण हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या हिंदू धर्माची भगवी ध्वजा उत्तुंग फडकवत ठेवणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य आहे.
 • ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा आमचा संदेश केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, देशातील तमाम हिंदूंचा चैतन्यमंत्र बनला आहे. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत सर्वत्र हिंदू खडबडून जागा झाला असून, या देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणार्थ एकवटला आहे. हिंदुत्वाची ही प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागणार असला तरी, त्या प्रक्रियेला आज चांगलीच गती प्राप्त झाली आहे. लवकरच जगाच्या नकाशात आणि इतिहासातही हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र म्हणून कोरले जाईल. या भारतभूमीतील हिंदूंनी एकवटावे ही नियतीचीच इच्छा होती आणि ही ऐतिहासिक प्रक्रिया शिवसेनेच्या हातून घडावी ही त्या ‘श्री’चीच इच्छा होती.
 • आज देशात जी हिंदुत्वाची लाट आलेली आहे ती केवळ शिवसेनेने फुंकर मारल्यामुळे आलेली नसून हिंदू समाजाच्या झालेल्या कोंडीतून निर्माण झालेली आहे. मध्यंतरी हिंदू जनतेच्या दीर्घकाळ दडपून टाकण्यात आलेल्या अस्मितेमुळे हिंदू समाजात एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली होती. आता आपल्याला कोणीच वाली राहिलेला नाही, अशा प्रकारची भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली. सत्तारुढ काँग्रेस पक्षाने हिंदूंना सतत सापत्नभावाने वागविले. अल्पसंख्याकांचे हित काँग्रेस आजपर्यंत जपत आल्याने आता हिंदूच अल्पसंख्य बनण्याचा धोका निर्माण झाला. मुसलमानांची संख्या आणि वस्ती एवढी वाढली की, देशाची सत्ता काबीज करण्याचा वल्गना त्यांच्याकडून सुरू झाल्या. परिस्थितीत असा अतिरेक झाला की, देशातील हिंदूंना एकत्र येण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. अशा वेळी योग्य नेतृत्वाच्या शोधात असलेला हिंदू समाज, शिवसेनेकडे आपोआप वळला.
 • या देशातील सर्व मुसलमान वाईट आहेत, देशद्रोही आहेत असे आम्ही कधीही म्हटले नाही आणि म्हणणार नाही.पण या देशाचे दुर्दैव असे की, स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांना योग्य ते नेतृत्व मिळाले नाही. स्वातंत्र्यपूर्ण काळात जिनांनी मुसलमानांचे नुकसान केले आणि स्वातंत्र्यानंतर शहाबुद्दीन, बुखारी, बनातवाला, मस्तानसारखे विषाने फसफसणारे नेतृत्व उदयास आले. त्यांच्यापुढे दुर्दैवाने मौलाना आझादांपासून ते हमीद दलवाईपर्यंत जे राष्ट्रवादी विधायक नेतृत्व होते, ते निष्प्रभ ठरले. मुसलमानांना लवकरच समजून चुकेल की आपण जातीने मुसलमान असलो तरी, हा देश आपला आहे आणि आपल्या या निष्ठा अबाधित राखून आजचे विषारी नेतृत्व झुगारून द्यायला हवे.
 • ‘हिंदू तितुका मेळवावा, हिंदू धर्म वाढवावा’ हाच विचार अखेर नवा हिंदुस्थान घडविणार आहे. एकगठ्ठा मुस्लिम मतांची तमा न बाळगता, हिंदूंची ‘व्होट बँक’ प्रभावी झाली पाहिजे. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली या देशात, आजवर मुस्लिम अनुनयाचा जो धुडगूस वर्षानुवर्षे चालला होता, तो उद्ध्वस्त करण्याच्या निर्धाराने, आता हिंदू समाजाने उभे ठाकले पाहिजे. इथल्या मातीशी इमान राखील तो हिंदू आणि हिंदुस्थानी ही आमची ठाम भूमिका आहे.
 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी

 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी

 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी