फटकारे

फटकारे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवलेला आहे. मात्र राजकारणापूर्वी बाळासाहेबांची खरी ओळख आहे ती एक जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून… त्यांच्या व्यंगचित्राच्या फटकाऱ्यांनी भलेभले राजकारणी घायाळ झालेले आहेत.  व्यंगचित्रकार बाळासाहेबांच्या ‘फटकारे’ या संग्राह्य पुस्तकाविषयी….सरळ रेषेत चालणारा मराठी माणूस बाळासाहेबांच्या तिरप्या रेषांवर निहायत खूष होता. प्रत्येक व्यंगचित्र म्हणजे प्रचलित परिस्थितीवर केलेलं सणसणीत भाष्य. हास्याचे फवारेच्या फवारे उडवता उडवता मनात अन्‌ मेंदूत एक ठिणगी पेरत जाणारं…
व्यंगचित्रकार हा एका अर्थी समाजसुधारकच तर असतो. एखाद्या निष्णात शल्यविशारदाप्रमाणे तो समाजमनाची अभूतपूर्व अशी चिरफाड करत असतो. यासाठी व्यंगचित्रकारापाशी सूक्ष्म अन्‌ तरतरीत अशी विनोदबुद्धी असावी लागते. भरपूर बेरकीपणा लागतो. अन्‌ डोक्यात एक जळजळीत असं रसायन लागतं. बाळासाहेबांच्या कुंचल्याचं शाईने फक्त भागत नसे. त्याला तेजाबाची तहान लागलेली असे….
‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘नवशक्ती’मधून बाळासाहेबांची आतषबाजी सुरू होतील. शिवाय, ‘मराठा’, ‘नवयुग’, ‘धनुर्धारी’च्या वाचकानांही त्यांनी जिंकलं होतं. विलक्षण उत्स्फूर्त अशी त्यांची व्यंगचित्रं मनाला पटकन भुरळ घालत. आजही यातली अनेक चित्रं रसरशीत अन्‌ ताजी वाटतात. ही सहजसुंदरता पुष्कळ मेहनतीनंतर येते. बाळासाहेबांच्या रेखांकनात अद्‌भुत ‘फोर्स’ आहे, असं कै. दीनानाथ दलाल अनेकदा म्हणत. या ताकदीचा विनिमय मात्र फार साक्षेपाने करत बाळासाहेब. म्हणूनच त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये एकीकडे रांगडेपण आहे आणि लुसलुशीत, अकृत्रिम अशी नजाकतसुद्धा. काळ्या दगडावर पांढरी रेघ तसा बाळासाहेबांचा आकृतिबंध. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय एकाही रेषेची लुडबूड नाही. सगळं चित्र एकदम कसं रेखीव अन्‌ गोळीबंद. व्यंगचित्राची ‘गॅग लाईन’ चमकदार अन्‌ टवटवीत. भाषा कधी कुरकुरीत तर कधी करकरीत. कधी मोरपिसासारखी हळुवार, तर कधी चाकूच्या रेशीमपात्यासारखी… व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब बहरत होते त्या पन्नासच्या दशकावर पं. नेहरूंची राजमुद्रा होती. सगळ्या काळावरच त्यांचं प्रभुत्व होतं. स्वातंत्र्य मिळून तीन-चार वर्षं झाली होती. नव्या गणतंत्राची जुळवाजुळव सुरू होती. काँग्रेसकडे बहुमत होतं. पंचवार्षिक योजना, समाजवाद, सेक्युलॅरिझम, पंचशील अशी रटमट रटमट सुरू होती. तरीही समाजमन आतल्या आत चलबिचल होतं. खोल असं काहीतरी धुमसत होतं. याच काळात महाराष्ट्रात कला आणि साहित्याच्या प्रांतात नव्या संवेदना जाग्या झाल्या. आयुष्याला थेट भिडणारी, नवा जीवनानुभव घेऊन निर्भयपणे उभी राहणारी नवकथा जन्माला आली. गाडगीळ-भावे-व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा, तेंडुलकरांची नाटकं, अन्‌ त्याही अगोदर मर्ढेकरांच्या कविता असे नवे कालवे निघाले. माणुसकीचा गहिवर, एक सर्वव्यापी असा मनस्वीपणा आणि प्रचलित समाजव्यवस्थेबद्दलची सात्त्विक चीड या प्रेरणांमधून हे नवं लिखाण आकारास आलं. विद्रोहाला कैकदा व्यंगाची मैत्री भावते. ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा गिरीणोदय झाला’ या मर्ढेकरांच्या ओळीत चरचरीत विरूपता आहे. ‘सत्यमेव’ऐवजी ‘सट्टामेव जयते’ असं बाळासाहेबांचं कॅप्शनही याच कुळातलं. व्यंगाचा आधार घेऊन एका भेसूर, विद्रूप सत्याचं दर्शन घडवणारं…
बाळासाहेबांची अनेक व्यंगचित्रं आजच्याही काळाला लागू अन्‌ म्हणूनच ताजी, टवटवीत वाटतात. उदाहरणार्थ, पदवीधर तरुणासमोर जबडा वासून उभा असलेला बेकारीचा भस्मासुर. म्युन्सिपाल्टीच्या नळातून जीव-जंतू नव्हे तर चक्क मासे बाहेर टपाटप पडताहेत. एकाहत्तरच्या युद्धानंतर इंदिरा गांधींनी भुट्टोंबरोबर सिमला करार केला होता. त्यावर बाळासाहेबांचं व्यंगचित्र एकदम भन्नाट आहे. सिमला कराराचं भेंडोळं भारत आणि पाकिस्तानच्या सीमांना पुलाप्रमाणे जोडताना दाखवलंय. त्यामुळे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करणं एकदम सोपं झालंय. आज हीच परिस्थिती आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात असतानाच्या काळातलं एक कार्टून आहे. मुंबई हातची जाऊ नये म्हणून एक लबाड दलाल देवाला साकडं घालतोय असं हे चित्र आजही समर्पक वाटतं. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात ‘कॉर्पोरेट सेक्टर’चा मुंबईवर डोळा आहे ना. असंच एक व्यंगचित्र आहे एका सामान्य नागरिकाचं. भर पावसाळ्यात सुरू झालेल्या वेगवेगळ्या संपांमुळे भेदरून गेलेला हा माणूस आजच्या आम मुंबईकरांचा अस्सल प्रतिनिधी आहे. ‘मी व्यंगचित्रकाराच्या हलकट नजरेतून सारं पाहत असतो’, असं बाळासाहेब अनेकदा म्हणतात. खरं तर त्यांच्याकडे ‘थ्री डायमेन्शनल’ अशी नजर आहे. आजूबाजूच्या भल्याबुऱ्या वास्तवातलं भेदक टिपणारी ही दृष्टी म्हणजे बाळासाहेबांचा ‘तिसरा डोळा’ आहे.
म्हणूनच ‘मार्मिक’ची सुरुवात झाली.
अन्‌ एका अपूर्व मन्वंतराचीही….
बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून रेखाटलेल्या व्यंगचित्रांचा संग्रह म्हणजेच ‘फटकारे’ हे संग्राह्य पुस्तक असून बाळासाहेबांचे हे ‘फटकारे’ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा…
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी