व्यक्ती परिचय – प्रबोधनकार ठाकरे

व्यक्ती परिचय – प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुध्द त्यांनी केलेल्या अखंड संग्रामाचे महाकाव्य असे म्हणता येईल. मिळेल तेथून ज्ञान संपादन करण्यासाठी अधाशाप्रमाणे वाचन करणारे आणि सखोल चिंतन करून सत्यासाठी लढणारे विचारवंत असे त्यांचे वर्णन करता येईल. आजकाल प्रागतिक म्हणून मिरवावयाचे असेल तर महात्मा फुले यांना स्तुतिसुमने वाहिली की पुरेसे होते. पण पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून फुले यांचा छळ झाल्यानंतरच्या काळात फुले यांचा लढा पुढे चालविण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे पुण्यात तळ ठोकून राहिले. त्यांच्या मार्गात विरोधकांनी आणलेले सर्व अडथळे त्यांनी मोडून काढले व त्यांनी केलेल्या छळास तोंड दिले. फुले यांचा लढा त्यांनी पुढे चालविताना साऱ्या विरोधकांची दाणादाण उडविली. त्यांची भाषणे आणि त्यांचे लेखन इतके प्रभावी होते की, त्याच माध्यमातून सत्यशोधकांचा लढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोचला.
लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा फुले यांच्या क्रांतिकारक वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणा करण्यासाठी आपण काय करावयास हवे याची एक खास अंतर्दृष्टी त्यांनी विकसित केली. त्या विचाराचा प्रसार करणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले. तत्त्वाचा प्रश्न आला की त्यांनी त्याबाबत कधीही तडजोड केली नाही. विधवांच्या केशवपनाची ती अभद्र रुढी असो, देवालयांतील ब्राह्मण पुजाऱ्यांची हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो वा हुंड्याचा, न्याय मिळविण्यासाठी सारख्याच त्वेषाने किंवा तिडिकेने लढत राहावे इतकेच त्यांना माहीत होते. यापासून परावृत्त करण्यासाठी कित्येकांनी त्यांना मोहवश करण्याचा प्रयत्न केला. पण त्या जाळ्यात ते कधी सापडले नाहीत. अत्यंत सावधानपूर्वक ते या मोहापासून दूर राहिले. अन्याय्य रुढी, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती या माध्यमातून त्यांनी सतत पुराणमतवाद्यांशी लढा दिला. आपल्या समाजातील सर्व दुखण्याचे मूळ ब्राह्मणी कर्मकांडात आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपास-तापास आणि ‘धर्म’ या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व ब्राह्मणांनी स्वतःच्या हितासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रुढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारापासून वंचित अशा गरीब बहुजन समाजावर अन्याय होतो, थोडक्यात सर्व अशिक्षित जनता या रुढीखाली भरडली जाते असे त्यांना वाटत असल्याने प्रबोधनकारांनी या मुळावर म्हणजे ब्राह्मणशाहीवर घाव घालण्याचे ठरविले. सुधारक विचाराच्या, उदारमतवादी ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनांत द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथाच्या जीवनावर आधारलेले ‘खरा ब्राह्मण’ या नावाचे त्यांचे एक नाटक आहे. या नाटकांत त्यांनी स्वतःच खऱ्या ब्राह्मणाची संकल्पना उलगडून दाखविली आहे. तथापि धंदेवाईक भिक्षुकवर्गावर ते कठोर टीका करीत असत. या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतःच सुधारणावादी आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे प्रबोधनकारांचे ते चाहते झाले, यात आश्चर्य नाही. पण प्रबोधनकार मात्र त्यांचे होयबा झाले नाहीत. महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली, कसोटी पाहिली आणि नंतर त्यांनीच जाहीरपणे सांगितले की, “ज्याला लाच देऊन वश करून घेता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली ती हीच (प्रबोधनकार) होय.”
नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. त्या काळात त्यांनी हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली. हुंडा पद्धतीवर कडक घणाघाती हल्ले केले. हुंडा प्रतिबंधक सर्व जातीची एक स्वयंसेवक सेना स्थापन केली. ही सेना स्वाध्याय आश्रम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केली व त्यासाठी आपल्या ‘प्रबोधना’चा उपयोग केला. या हुंडा प्रतिबंधक मोहिमेचा इतका चांगला परिणाम झाला की त्यामुळे अनेक वरपित्यांना आधी घेतलेली हुंड्याची रक्कम वधूच्या पित्यांना परत करणे भाग पडले. त्यांच्या या मोहिमेची झळ एका न्यायाधीशालाही भोवली. ज्या काळात आधी ‘प्रेम’ करणे हा व्यभिचाराचा गुन्हा समजला जाई, त्या काळात प्रबोधनकारांनी अनेक प्रेमिकांचे विवाह लावून दिले होते.
ते एक विपुल लेखन करणारे, झपाटलेले लेखक होते. पण त्यांचा भर साहित्यिक गुणविशेषावर नसून सर्व लेखन विशिष्ट ध्येयाच्या प्रचारासाठीच होते. त्यांनी लिहिलेली ‘टाकलेले पोर’ आणि ‘खरा ब्राह्मण’ ही दोन्ही नाटके त्याच स्वरूपाची असणे स्वाभाविक होते. या नाटकांनी इतिहास निर्माण केला. ‘खरा ब्राह्मण’ नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये, असा पुण्यातील ब्राह्मणांनी न्यायालयात अर्ज केला. या नाटकाचे संवाद अभ्यासून न्यायाधीश म्हणाले, “ठाकरे धर्माची बाजू उचलून धरीत आहेत. त्यांना विरोध कशासाठी करता? सहकार्य करा!”
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता. आयुष्यभर संघर्ष करीत राहिल्याने त्यांचे शरीर कृश झालेले होते. वार्ध्यक्यामुळे धावपळ अशक्यप्राय होती. तशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला नेतृत्व दिले. मागे हटण्याचे त्यांनी नाकारले. या चळवळीला दिलेले त्यांचे योगदान इतर कोणापेक्षाही कमी नव्हते. बरोबरीच करावयाची तर ती आचार्य अत्रे किंवा कॉम्रेड डांगे यांच्याशी करता येईल. या लढ्यात त्यांनी सर्वात महत्त्वाची अशी एक भूमिका बजावली ती ही की, अनेक वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना या चळवळीसाठी एकत्र बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. चळवळ यशस्वी होईपर्यंत सर्व जण एकत्र टिकून राहिले, हे प्रबोधनकारांच्या मुत्सद्देगिरीचे आणि अधिकाराचे फलित आहे.
थोडक्यात सांगावयाचे तर प्रबोधनकार हे एक थोर समाजसुधारक होते. पण पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचे योग्य आणि पूर्ण मूल्यमापन झालेले नाही, हे केवढे दुर्दैव!
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी