सामना

सामना

२३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन प्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल.” तामिळनाडूत काँग्रेसचा पराभव केल्याबद्दल श्री. करुणानिधी यांचे त्यांनी अभिनंदन केले. शिवसेनेकडे आर्थिक कार्यक्रम नाहीत म्हणून आमच्यावर टीका होते, पण ‘द्रमुक’कडे तरी कोठे आर्थिक कार्यक्रम आहे, असा सवाल त्यांनी केला. या समारंभाला मोठी उपस्थिती होती. सर्वांना प्रवेश नसल्याने अनेक जण बाहेर उभे राहून भाषण ऐकत होते. ‘सामना’चे प्रकाशन होताच, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या समारंभात महापौर छगन भुजबळ, शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर यांचीही भाषणे झाली. ‘सामना’चे कार्यकारी संपादक श्री. अशोक पडबिद्री यांनी प्रास्ताविक केले तर, श्री. सुभाष देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला.’ या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. वाचकांना उद्देशून अग्रलेखात बाळासाहेब म्हणाले होते- “प्रिय वाचकहो, आज दैनिक ‘सामना’स सुरुवात होत आहे. बरीच वर्षे दैनिक काढायचे काढायचे चालले होते. परंतु सर्व अडचणी आणि कटकटी यांमधून दैनिकासारखा व्याप अंगावर घ्यायचा म्हणजे हल्लीच्या काळात द्रोणागिरी पर्वत उचलण्यासारखाच प्रकार म्हणायचा. परंतु हे मारुतीचे बळ केवळ जनता जनार्दनाने आम्हाला दिले आणि त्या बळावरच हे पर्वतप्राय कार्य आम्ही करू शकलो.
फ्री प्रेस सोडल्यानंतर १३ ऑगस्ट, १९६० या वेळी ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाला आम्ही हात घातला. त्या वेळची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. कारण मराठी साप्ताहिके धडाधड बंद होत होती. आचार्य अत्र्यांचा ‘नवयुग’, ‘समीक्षक’, श्री. रामभाऊ तटणीसांचे ‘विविधवृत्त’ आणि बाकीची मासिके यांनी केव्हाच राम म्हटला होता. अशी परिस्थिती असताना आम्ही साप्ताहिकाचे धाडस केले. दत्ताजी पंतांचा शाप तर नेहमीच असतो, परंतु त्या वेळी प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आमचे वडील यांचे नैतिक पाठबळ आणि बुवासाहेब दांगट यांची मदत यामुळेच ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक निघू शकले. इतर दैनिकांनी आपली साप्ताहिकी सुरू केल्यामुळे – थोडक्यात रविवारच्या आवृत्त्या काढायला सुरुवात झाल्यामुळे, मराठी साप्ताहिकांवर त्याचा परिणाम झाला. परंतु त्याला टक्कर देऊन ‘मार्मिक’ आपल्या व्यंगचित्रीय वैशिष्ट्यामुळेच मजबुतीने उभे राहिले. आज ‘मार्मिक’ला २८ वर्षे पूर्ण झाली. ‘मार्मिक’च्या माध्यमातून शिवसेना उभी राहिली आणि शिवसेनेच्या प्रचारतंत्रातून आज दैनिक ‘सामना’ उभा होत आहे.
इथे केवळ आम्हालाच नव्हे, तर तमाम हिंदू बांधवांच्या-भगिनींच्या आनंदास पारावार उरलेला नसेल. बँकेची कर्जे डोक्यावर घेऊन आम्ही ‘सामना’स उभे करीत आहोत; तरी पण आता मागे फिरायचे नाही. एरव्ही आम्ही या फंदात पडलो नसतो. परंतु शिवसेनेचा व्याप जसजसा वाढू लागला आणि आता तर तिची पाळेमुळे ग्रामीण भागात पसरू लागली, तसतशी दैनिकाची अडचण भासू लागली. ताकद दोन हात करताना साप्ताहिकाची शक्ती कमी पडू लागली. कारण शिवसेनेच्या वाढत्या यशामुळे शत्रूही वाढू लागले. कुणाचे भले पाहणे हे आमच्या देशाच्या स्वभावात नाही. कारण राजकारणाने सगळे नासवले. कौतुक नाही, सहकार्य नाही! पुन्हा पक्षीय लेबले असल्यामुळे पोटदुख्या आणि मुरडेच जास्त. खाजगी भेटीत मात्र आपण करता आहात ते फार चांगले करता आहात, कुणीतरी असे करायला हवे वगैरे वगैरे मुक्ताफळे उधळण्यामध्ये हे कावळे पटाईत. आम्ही महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राच्या बाजूने, म्हणजे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी उभे राहिलो, त्या वेळीही आम्हाला संकुचितवादी, प्रांतीयवादी, जातीयवादी अशी विशेषणे लावण्यात आली, तरी आम्ही हटलो नाही. आता देशावर छुप्या पाकधार्जिण्या मुस्लिमांचे हिरवे मनसुबे लादले जात असताना आणि पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांचे हिंसाचाराचे हत्याकांड चालू असताना या देशात आता हिंदुत्वाच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. आणि हा धोका टाळण्यासाठी माझ्या मराठी मातीने जर पुढाकार घेतला नाही तर केवळ हतबलतेने या देशाची दुसरी फाळणी पाहण्याचे नशिबी येण्याची शक्यता आहे. केवळ याच पोटतिडिकेने आम्ही हिंदुत्वाला धार आणण्यास बसलो.
दैनिक ‘सामना’ वेळोवेळी अनेक विषय हाताळणार आहे. येणारे हल्ले परतवणार आहे. अनेक प्रश्न आम्हाला संयमाने हाताळावे लागतील. पण बरीच प्रकरणे आम्हाला आमची लेखणी ज्वालामुखीच्या लाव्हारसात बुडवून लिहावी लागतील. त्यामुळे क्षणभर काही लोकांना आमच्या भाषेचा तोल गेल्यामुळे कावल्यासारखे होईल. परंतु त्यामागील अन्यायाबद्दलची चीड त्यांनी लक्षात घ्यावी. एरवी आम्हाला आपणाहून कोणाला दुखवायचे नाही. आजपर्यंत आम्ही तसे केले नाही आणि करणार नाही! ज्या ज्या वेळी अंगावर आले, त्याच वेळी शिंगाचा वापर आम्ही केला आहे. एरवी काही चांगल्या गोष्टींचे आम्ही रणशिंग फुंकून स्वागतच केले आहे. ‘सामना’चे वैशिष्ट्य म्हणजे दैनिक ‘सामना’ हा वृत्ताचे ‘पावित्र्य’ राखणार आहे. विरोधकांच्या बातम्या कुठे दाबल्या जाणार नाहीत. त्यांना प्रसिद्धी, व्यवसायातील जे पावित्र्य टिकवायचे असते त्या दृष्टीने, त्या बातम्यांना अवश्य महत्त्व दिले जाईल. परंतु त्यानंतर ‘भाष्य’ आमचे राहील. वार्ताहरांच्या बातम्यांतून वार्ताहरांचे भाष्य मात्र ‘सामना’च्या स्तंभातून केले जाईल. हे पावित्र्य सध्या नष्ट झाले आहे, ते ‘सामना’ टिकविणार.
आज या दैनिक ‘सामना’च्या प्रश्नाच्या वेळी आम्हाला प्रकर्षाने जर कुणाची आठवण होत असेल तर, प्रथम आमच्या वडिलांची, कारण त्यांची मनापासून इच्छा होती की, महाराष्ट्राचे असे एक प्रखर, स्वतंत्र विचारप्रणालीचे दैनिक असावे. ते स्वप्न आता जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुरे होत आहे. दुसरे स्मरण होत आहे ते, नाशिकचे प्रा. वि.मा.दी. पटवर्धन यांचे. प्रबोधनकारांनंतर वि.मा.दी.नीच अक्षरश: आमच्या पाठीवरून आधाराचा हात फिरवला होता. आज ते हात जरी दुरावले असले तरीही अशा आदर्शाची जाणीव आम्हाला कुरवाळीत आहे. आणि तिसरे स्मरण आमचे बुवासाहेब दांगट यांचे.
आता सर्वात शेवटी आभार मानायचे झाले तर आमच्या सर्व हितचिंतकांचे. त्यामध्ये आमचा शिवसैनिक कुठे मागे राहिला नाही. त्यांनीही अनेक कार्यक्रम उभे करून जे काही जमले ते दैनिक ‘सामना’साठी आणून दिले. काहींनी पत्राने विचारणा केली. यामध्ये आर्थिक बाबीला महत्त्व नाही. जे हात आमच्या मागे उभे राहिले तेच आमचे खरे भांडवल. या उभ्या राहिलेल्या हातांनीच आम्ही ‘सामन्या’ला तयार झालो. आजपासून सुरू होणारा हा ‘सामना’ या हातांसाठी पराकोटीची लढत देणार. आणि उद्या महाराष्ट्र विधानसभेवर शिवरायांचा हा भगवा झेंडा आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या साधू-संतांच्या साक्षीने मजबुतीने फडकविणारच. तो तसा फडकणारच याबद्दल आम्हाला खात्री आहे!
जय हिंद, जय महाराष्ट्र.”
प्रकाशन प्रसंगी ‘सामना’चे संपादक बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “सामना हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे. त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वत:ची प्रतिमा सुधारावी, हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. कारण तो फुटला तर, त्याचे तुकडे पडतील आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रूप दिसेल. आमच्या वृत्तपत्राची भाषा जहाल असेल, तिखट वाटेल, बोचरी असेल. काही वेळा ती असभ्य वाटेल. त्यांनी हे वाचताना विषय समजून घ्यावा. त्या विषयावरील तिडीक व्यक्त करण्यासाठी ती भाषा वापरली जाईल. काही वेळा जमालगोटाच द्यावा लागेल (हशा व टाळ्या) व तो आम्ही देणारच. सामना हे ‘न्यूजपेपर’ आणि ‘मार्मिक’ हे ‘व्ह्यूजपेपर’ राहील.”
‘सामना’मधून शिवसेनाप्रमुखांचे संदेश येऊ लागले. पहिलाच संदेश होता- “लहानपणी ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ ही ओळ आम्ही उत्साहाने म्हणत असू. घरात गरिबी असली तरी ओठावर ही ओळ नाचताच थोरा-मोठ्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाची श्रीमंती नाचावयाची. परंतु गेल्या बेचाळीस वर्षांत, स्वातंत्र्याच्या या काळात काँग्रेस राजवटीने देशाची पूर्ण मसणवटी बनवली आहे. आज तरी सर्वत्र रेशनच्या रांगा, साखरेचा तोटा, गव्हाचा तोटा, रॉकेलचा तोटा, तेला-तुपाचा तोटा; महागाईचा रावण ‘आ’ वासून उभा! मग सांगा बांधव – भगिनींनो, कोणाला ‘दसरा सण मोठा’ वाटेल? यावर एकच उपाय; येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावणाला उताणा पाडून शिवसेना-भाजप युतीचेच सरकार स्थापन करावे आणि जीवनाचा आनंद लुटण्यासाठी दमदारपणे उभे राहावे. आणखी एक सांगतो की, काँग्रेसच्या रावणाने निवडणुकीच्या तोंडावर फेकलेल्या आश्वासनांच्या खिरापतीवर भाळून जाऊ नका. पंचायत राज्यासारख्या मृगजळाने दिपून जाऊ नका. मागून पश्चाताप होण्यापेक्षा आजच जागतेपणाने आपल्या मताने सामर्थ्य ओळखा आणि काँग्रेसचा रावण गाडा!! यातच तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे भवितव्य अवलंबून आहे. अशी सुबुद्धी तुम्हाला नवरात्रात पूजलेल्या दुर्गामाता, अष्टभुजा, महालक्ष्मी, एकवीरा, अंबाबाई, तुळजापूर भवानी, प्रतापगड भवानी, सप्तशृंगी आणि गोमंतकातील शांतादुर्गा आदी दैवत, सर्व शक्ती तुम्हाला देतील आणि प्रखर हिंदुत्वाचा विजय होईल. आम्हाला खात्री आहे, त्रिवार खात्री आहे.”
बाळासाहेबांचे अग्रलेख वाचण्यासाठी ‘सामना’वर झुंबड पडू लागली. सामना सहा महिन्यांचा झाला तेव्हा बाळासाहेबांचा अग्रलेख त्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाला. अग्रलेखाचे शीर्षक होते “तुमचा ‘सामना’ सहा महिन्यांचा झाला!”
‘सामना’ सहा महिन्यांचा झाला. दैनिक निघणार निघणार, म्हणून बराच काळ गेला आणि ‘सामना’ सुरू होऊन सहा महिने कसे गेले तेही कळले नाही. मात्र एक, दैनिक ‘सामना’ निघताच वृत्तपत्र सृष्टीत एकच हादरा बसला आणि खळबळही माजली. अनेकांचे धाबे दणाणले. आजही शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र म्हणून ‘सामना’ची स्वत:ची ओळख आहे.
शिवसेना पुढे जाण्यामध्ये, मोठी होण्यामध्ये आणि यशस्वी होण्यामध्ये ‘सामना’चा सिंहाचा वाटा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात ‘सामना’मधूनच झाली होती. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘सामना’चे संपादक अशी दुहेरी जबाबदारी उद्धवजी सांभाळीत आहेत, तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक म्हणून ‘सामना’ची संपादकीय जबाबदारी उत्तमपणे पार पाडीत आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते म्हणूनही पक्षाची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर समर्थपणे मांडीत असतात.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी