शिवसेना भवन

शिवसेना भवन

शिवसेना भवन
शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू – शिवसेनाप्रमुख
१९ जून १९७७ रोजी मुंबईच्या दादर भागात मध्यवर्ती ठिकाणी समारंभपूर्वक ‘शिवसेना भवन’चे उद्घाटन झाले. शिवाजी पार्कवरील ही इमारत फुगे व सेनाध्वज यांनी सुशोभित करण्यात आली होती. समारंभासाठी निरनिराळ्या ठिकाणचे सैनिक मिरवणुकीने आले होते. शिवसेना भवनात या सगळ्यांना जागा मिळू न शकल्याने बऱ्याच सैनिकांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यामुळे न.चिं. केळकर मार्गावरील वाहतूक बंद पडली. सुरुवातीला सर्वश्री मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, नारायण आठवले प्रभृतींची भाषणे झाली.
उद्घाटनाचे प्रमुख भाषण करताना शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हा अदम्य उत्साह, ही निष्ठा अन् निष्ठावंतांचा सागर अन्य संघटनांजवळ नाही. म्हणून त्यांना शिवसेनेविषयी मत्सर वाटतो आणि पावलोपावली आपल्याला विरोधास तोंड द्यावं लागतं. महाराष्ट्राचं राजकारण आणि विकासाच्या गंगेचा प्रवाह अनुकूल दिशेला वळवण्याचं सामर्थ्य शिवसैनिकांत आहे आणि यापुढे महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या दिशेने विकासगंगेचे प्रवाह वळवण्याचं कार्य आपण हाती घेऊया. या महागड्या मुंबईत श्रीमंतांच्या मिरासदारीला आव्हान देण्यासाठी आपली वास्तू उभी राहिली असून या वास्तूतून गरीब महाराष्ट्राचं आणि दरिद्री मराठी समाजाचं जीवन वैभवशाली बनवूया. आगामी विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे उभी राहून लढवण्यास सज्ज आहे (टाळ्यांचा व घोषणांचा जयघोष).
दोन महिने आपण जरा थांबू. पावसाळ्याचे दिवस आहेत. इकडे पीक कसं येतं व तिकडे पीक कसं येतं ते पाहिलं पाहिजे (प्रचंड हंशा). ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. या महिन्यापासूनच शिवसेना आंदोलनाच्या मैदानात उतरेल (प्रचंड टाळ्या). ज्या व्यापारी बांधवांनी अजूनही आपल्या दुकानावर मराठी पाट्या लावल्या नसतील त्यांनी त्या लावाव्यात अशी सूचना मी आताच करून ठवतो. महाराष्ट्राचं मराठीपण कायम राहिलं पाहिजे आणि हे काम तुम्ही-आम्हीच एकजुटीने करू शकू.
दुसरे लोक अनेक आंदोलनं करतात. त्यातलं एकही यशस्वी होत नाही. बाकीच्यांनी काहीही वाजवलं (हंशा) तरी आंदोलनाला यश येत नाही, पण शिवसेनेने नुसतं तोंड वाजवलं तरी आंदोलन यशस्वी होतं (टाळ्या). अनेक जण म्हणतात, भाववाढविरोधी आंदोलन सुरू करू तेव्हा मात्र ते आमच्या ‘स्टाईल’नेच होईल हे व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावं (टाळ्या).
सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे हे मी आजच्या दिवशी मुद्दाम सांगतो. मोरारजीचं आणि आमचं वैर नाही, पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांबद्दल जे उद्गार काढले ते त्यांनी परत घ्यावेत. मग त्यांचं आमचं वैर संपलं. पण त्यांनी ते नाकारलं तर सबंध मराठी माणूस आपली ताकद मोरारजींच्या विरोधात उभी करील. पंतप्रधान पंडित नेहरूंना सुद्धा या महाराष्ट्रात आंदोलनाला तोंड द्यावं लागलं होतं.
शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच (टाळ्या), पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे.
शिवसेना भवन – नवीन वास्तू
शिवसेना भवनाची नवीन वास्तू विजयाचा दिवस पाहील – शिवसेनाप्रमुख
सन १९९२-९३ मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले, त्यात २५१ माणसे मृत्युमुखी पडली. यातील एक बॉम्बस्फोट शिवसेना भवनजवळील पेट्रोल पंपावर करण्यात आला. शिवसेना भवन उद्ध्वस्त करण्यासाठीच हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात शिवसेना भवनचे बरेच नुकसान झाले. शिवसेनाप्रमुखांच्या चेंबरमध्येही मोठ्या भेगा पडल्या होत्या. काही वर्षे तशीच गेली आणि शिवसेना भवन पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन शिवसेना भवनचे उद्घाटन गुरुवार दि. २७ जुलै २००६ रोजी झाले. हा दिवस म्हणजे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. सकाळपासून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती आणि सायंकाळी वाजत-गाजत-नाचत शिवसैनिक शिवसेना भवनसमोरच्या गडकरी चौकात आपले लाडके नेते शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी एकत्र आले. संध्याकाळी बरोबर आठ वाजता बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनावर पोहोचले. शिवसैनिकांच्या भावना उचंबळून आल्या. एकच गर्दी झाली. बाळासाहेब प्रवेशद्वारावर पोहोचले आणि त्यांना औक्षण करण्यात आले. त्यासाठी महिला विभाग संघटक सौ. स्वाती शिंदे व इतर महिला उपस्थित होत्या.
ढोल वाजवून, टाळ्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेबांचा जयजयकार करीत कार्यकर्ते नाचू लागले. शिवसेनाप्रमुखांनी फित कापून उद्घाटन केले. मागोमाग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून उद्धवजी प्रथम सरकले. शिवसेनाप्रमुखांनी प्रथम भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यांनी जगदंबेला प्रार्थना केली. उपस्थित असलेल्या गुरुजींनी बाळासाहेब, उद्धवजी यांना प्रसाद दिला आणि शिवसेनाप्रमुखांनी गडकरी चौकात उपस्थित असलेल्या लाखो शिवसैनिकांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. हे दृश्य पाहात असताना अनेकांना पूर्वीच्या शिवसेना भवनाची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या कार्यक्रमासाठी भाजपा नेते श्री. गोपीनाथ मुंडे हेही आलेले होते.
शिवसेनाप्रमुख भाषणाला उभे राहिले तेव्हा सारे सभागृह, सारे रस्ते, गडकरी चौक क्षणभर स्तब्ध झाला होता. शिवसेनाप्रमुखांचे शब्द ऐकण्यासाठी जणू काळच थांबला होता. शिवसेनाप्रमुख म्हणाले,
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, आज उद्धवचा वाढदिवस. रामदासचाही वाढदिवस. आणखी किती जणांचे आहेत. मला माहिती नाही. त्या साऱ्यांनाच माझ्या शुभेच्छा.
एवढं काही भव्यदिव्य उभं राहील असं वाटलं नव्हतं. पण हे सारं शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे घडलं आहे. शिवसेना भवनाची ही नवी वास्तू छान आहे. ही वास्तू शिवसेनेला चांगले दिवस आणील. आता पूर्वीचा जोश राहिलेला नाही. पूर्वी महाराष्ट्रभर दौरे केले. ९० साली संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. १६४ सभा घेतल्या. सकाळी दोन आणि संध्याकाळी तीन सभा घ्यायचो. थोडक्यात सत्ता गेली. पण ९५ मध्ये मात्र आली. आता पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणायची आहे. देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. सगळीकडे नुसती मौजमस्ती चालू आहे. एका जबरदस्त ताकदीने ही सत्ता उलथवून टाकायलाच हवी. हे माझं वाक्य आहे. धर्मवाक्य आहे. शिवसेना भवनाची नवीन वास्तू विजयाची दिवस पाहील. हे विजयाचे दिवस आणण्याचे काम तुमचे आहे. आज ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो.
शिवसेना संपवून टाकणारा कोणी अजून जन्माला आलेला नाही. यापुढे येणारही नाही. शिवसेना संपवायला निघालेले संपले. पण सेना अबाधित आहे. देशात ऐंशी सेना उभ्या राहिल्या होत्या. एकच शिवसेना जगली, बाकी सगळ्या संपल्या. उद्धवला कार्याध्यक्ष तुम्हीच केलेले आहे. मी घराणेशाही करणार नाही. शिवसेनेला पुढे नेण्याची जबाबदारी तुमचीच आहे. पण उद्धवलाही पक्ष चालवताना काही पथ्यपाणी पाळावीच लागतील. मी जशी शिवसेना चालवली, तशीच चालवायला हवी. (गोपीनाथजी मुंडे यांच्याकडे पाहून) आपण निवडणुकीसाठी नाही, तर हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो आहोत.
१९६६ च्या पहिल्या सभेत लोंढे आवरा असे मी बजावलं होतं. त्यासाठी परमीट सिस्टीम काढा अशी सूचना केली होती. पण कम्युनिस्टांनी त्याला विरोध केला. आता मी पुन्हा सांगतोय, बांगलादेशी मुसलमानांना मुंबईतूनच नव्हे तर देशातूनच ढुंगणावर लाथ घालून बाहेर हाकलायला हवं. कसलं शांघाय करताय? पहिल्या झोपड्या आवरा. मुंबईची शान गेलीय. विलासराव आपले बोलतच असतात. दुसरे आबा, काय त्यांचं आडनाव, हा पाटील. त्या मंत्रालयात सगळे पाटीलच भरलेत. पण मंत्रालयात कोणी जात नाही. बघावं तेव्हा ते बाहेरच दिसतात.
बॉम्बस्फोट झाले, पण अजूनही एकही अतिरेकी असल्याचं शाबित झालेलं नाही. पोलीस पकडतात. सोडतात. बॉम्बस्फोटांत पकडलेले आरोपी निव्वळ संशयित आहेत. संशयित, संशयित आणि संशयितच. पुरावे नसल्याचे सांगून कोर्ट त्यांना सोडून देते. मी पोलीस खात्याला दोष देत नाही. ही सर्व जबाबदारी गृहखात्याची आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर बालगंधर्वांचं पद आठवलं. ‘संशय का मनी आला?’ आर.आर. पाटील यांना काहीच कळत नाही. कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा महत्त्वाच्या समस्या असूनही ते बारबंदी, लॉटरीबंदीतच अडकून बसले आहेत. शिक्षणाची बोंब आहेच. मी जात-पात मानीत नाही. जे पाकिस्तानात मिळत नाही, ते इथे हिंदुस्थानात मुसलमानांना मिळतं. आरक्षणाचे चोचले पुरवले जात आहेत. तो अर्जुनसिंग सतत मुसलमानांची बाजू घेतो. कुणाची अवलाद आहे ही? पुढच्या वेळी तो दिसेल की नाही शंकाच आहे.
सोनिया गांधींना महान म्हणवणाऱ्यांचे मला एक नवलच वाटतं. दिल्लीचे ते नपुसंक राज्यकर्ते त्या बाईपुढे लवतात. काय संबंध तिचा? कोणीतरी जाहिरात बनवली, सोनियांनी देशासाठी कपाळावरचं कुंकू पुसलं. अरे कपाळावर कधी कुंकूच लावलं नाही तर पुसणार काय?
बाबरी पाडायला जमले ते सारे हिंदू म्हणून एकत्र आले होते. पण जबाबदारी कोणीच घेत नव्हता. ते कोण सुंदरलाल भंडारी की कोण ते म्हणाले, हे शिवसेनेचेच काम आहे. तेव्हा मी ठणकावून सांगितलं, होय, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. मी रणांगणातून पळून जाणार नाही. अरे गधड्यांनो, रामाच्या नावावर विटा जमवल्या त्याचं पुढे काय झालं?
आता शिवसेना पुढे न्यायची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. तुम्ही उद्धवला साथ द्यायची आहे.
राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेले शिवसेना भवन डोळ्यांसमोरून हलत नव्हते.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी