पहिला मेळावा

पहिला मेळावा

२३ ऑक्टोबर १९६६ रोजी ‘मार्मिक’मध्ये पहिल्या पानावर मजकूर छापून आला. “रविवार ३० ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा! स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. ‘जय महाराष्ट्र’!” आणि व्यंगचित्र होते की अपेक्षाभंग, अन्याय, उपऱ्यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणाऱ्या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे. या एका बातमीमुळे आणि व्यंगचित्रातील आशयामुळे ३० तारखेच्या मेळाव्याला शिवाजी पार्कवर चार लाख मराठी जनता गोळा झाली.
शिवसेनेच्या या मेळाव्याप्रसंगी व्यायामशाळांच्या कसरतीचे अप्रतिम प्रयोग झाले. श्री. बाळासाहेब ठाकरे, रामराव आदिक आदींनी या व्यायाम कसरतीच्या प्रयोगाचा आनंद लुटला. सुप्रसिद्ध संगीतकार वसंतराव देसाई यांनी समरगीत गाऊन वातावरण धुंद केले तर शाहीर साबळे आणि पार्टीने महाराष्ट्र गीताने मराठी माणसांत एक चैतन्य निर्माण केले.
प्रबोधनकार ठाकरे यांनी व्यासपीठावरील शिवप्रभूंच्या पुतळ्याला वंदन केले. भाषणात प्रबोधनकारांनी आपल्या ‘ठाकरी’ भाषेत विरोधकांचा समाचार घेतला. ‘‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दांचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचा काय परिणाम होईल याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यकाळात पाहायचे असतील तर ते पाहायला मिळतील.’’
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले,
‘‘हे असं दृश्य आहे की, जो कोणी येथे आला नसेल तो दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मला वाटतं, महाराज जर येथे असते तर त्यांचं घोडंसुद्धा उधळलं असतं! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसऱ्याच्या दिवशी होणार होता. पण तो लांबला. कारण महाराजांना असं वाटलं असेल की, काय उपयोग आहे येऊन या शिवाजी पार्कवर? जेथे माझा मराठी माणूस भेकड, नेभळट, नामर्द झालेला आहे, तिथे पार्कमध्ये भय्ये हिंडताहेत चुरमुरेवाले, खाणारेदेखील उपरेच. म्हणून महाराजांनी ठरवलं असेल की प्रथम हा ‘शिवसेने’चा मेळावा पाहतो, मराठी माणूस जिवंत आहे की नाही ते बघतो आणि तो जिवंत असेल तर मग १३ ला नाही ६ तारखेला येतो!
जे आमच्यावर आरोप करताहेत त्यांना मला सांगायचं आहे की, जर मराठी माणूस हा जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित मनोवृत्तीचा असता तर सदोबाची ही मुंबई कॉस्मोपोलीटन झालीच नसती. कारण आम्ही विशिष्ट दृष्टिकोनांतून पाहिलं की आपण सगळे भारतीय आहोत. ते मद्रासचे मुख्यमंत्री मद्रास येथे म्हणतात की, ज्याला उत्तम तामीळ येतं त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल. आम्हालाही आमच्या राज्यकर्त्यांना हेच सांगायचंय की, ज्याला उत्तम मराठी येतंय त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल, हाऊसिंग गाळा मिळेल. होय, मी प्रांतीय आहे, जातीय आहे, संकुचित वृत्तीचा आहे. हिंदीत आलेल्या फतव्याला केराची टोपली दाखवा हे म्हणणाऱ्या कामराजांनी महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवू नये! महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग असा आरोप करतात की, ‘शिवसेना’ हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचं कुंपण घालीत आहात. पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रद्धेचं आहे.”
शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून शरद पवार आपल्या साथीदारांसह हा पहिला मेळावा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी हजर होते. त्याशिवाय कला, क्रीडा आणि साहित्य विश्वातील अनेक मंडळींची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.
शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याने बरेच काही साधले. टीकाकारांनी जरी टीका केली तरीसुद्धा केवळ मुंबईतीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस जागा झाला.
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ही फार मोठी शक्ती असून मराठी माणसाच्या हिताचे रक्षण शिवसेनाच करू शकते याची त्यांना खात्री झाली. विधानसभेत, लोकसभेत शिवसेनेबद्दलची चर्चा सुरू झाली. मुंबईची शिवसेना, महाराष्ट्राची शिवसेना….
हळूहळू तिचे तरंग देशात उमटू लागले…
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी